दुर्गम भागातील एक आदर्श गाव मेडपल्ली

119

-२००९ पासून दारूबंदी कायम
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : अहेरी तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले मेडपल्ली या गावाने २००९ पासून दारूबंदी कायम टिकवून ठेवत एक आदर्श निर्माण केला आहे. या गावात अवैध दारूविक्री होत नसल्याने गुण्यागोविंदाने लोक राहतात.
मेडपल्ली या गावाने २००९ पासून ऐतिहासिक निर्णय घेऊन आपल्या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार केली. तेव्हापासून या गावामध्ये सामाजिक, धार्मिक व वयक्तिक कार्यक्रम शांततेत पार पडत आहेत. भांडण-तंट्यांचे प्रमाण सुद्धा अल्प आहे. ग्रामस्थ मोठ्या आनंदाने वास्तव्य करतात. शाळकरी मुलांसह महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणामध्ये गुंतले असून आपल्या भविष्याच्या योग्य दिशेने वाटचाल करीत आहेत. गावात दारूबंदी असल्याने युवकांसह लोकांचे दारूकडे लक्ष जात नाही. ही दारूबंदी कायम टिकवून ठेवण्यासाठी मुक्तिपथ गाव संघटना, प्रतिष्टीत नागरिक व ग्रामस्थांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. मुक्तिपथ तालुका चमू सुद्धा गावाला भेट देत अनेक उपक्रम राबवित लोकांना दारूबंदी कायम ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुचवीत आहेत. मागील १५ वर्षांपासून दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी ग्रामस्थ एकजुटीने प्रयत्न करीत आहेत. हे एक आदर्श गाव म्हणून नावारूपास आले आहे. नुकतेच गाव संघटनेच्या पुढाकारातून व ग्रामस्थांच्या श्रमदानातून गावामध्ये दारूबंदीचा विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. या गावाचा आदर्श इतरही गावाने घेऊन आपल्या गावात अवैध दारूविक्रीबंदी लागू करण्याचे आवाहन मेडपल्ली वासीय व मुक्तिपथने केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here