– कारगील चौकात शहीद पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर, गडचिरोलीतील कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने “शांततेसाठी जमूया” या टॅगलाइनसह एका भावनिक श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, २४ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता करण्यात आले.
या कार्यक्रमात शहरातील विविध सामाजिक संघटनांचे सदस्य, युवकवर्ग, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या हातात मेणबत्त्या होत्या, डोळ्यांत अश्रू होते आणि अंतःकरणात देशभक्तीचा जागर दिसून येत होता.
कार्यक्रमादरम्यान शहीद पर्यटकांच्या स्मृतीसाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. उपस्थितांनी शांतता, एकता आणि सामाजिक सलोख्याच्या जतनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. “शांततेसाठी जमूया, एकतेचा उजेड पसरवूया” या घोषवाक्याने संपूर्ण परिसर भारावून गेला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन उदय धकाते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी मंडळाचे सुनील देशमुख, डॉ. बिडकर, राजू पुंडलिककर, मोतीराम हजारे, संजय गद्देवार, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, प्रकाश धकाते, सुचिता धकाते, निलिमा देशमुख, वनिता भांडेकर, चान्नावार, राजू सालवे, श्रीकांत पतरंगे, महेंद्र ब्राम्हणवाडे, चंद्हेशेखर भडांगे, सुशील हिंगे, गीता हिंगे, विजय सालवे, प्रा. सालवे, विश्वजीत कोवासे तसेच खासदार नामदेव किरसान, सतीश विधाते, रजनीकांत मोटघरे, प्रफुल्ल आंबोरकर, विता मोहरकर, विजय सुरपाम, राज डोंगरे, अंकित कुळमेथे, अजय सिडाम, अजय सुरपाम, विवेक वाकडे, महादेव कांबळे तसेच अनेक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
ही श्रद्धांजली केवळ एक औपचारिकता नव्हती, तर दहशतवादाविरोधात गडचिरोलीच्या जनतेने व्यक्त केलेली एकजूट, शांततेचा संदेश आणि देशप्रेमाची प्रतीती होती.
