मुडझाचा गाव तलाव फुटला : मच्छीमार आणि शेतकऱ्यांना बसला फटका

298

– शेतकरी कामगार पक्षाने नुकसान भरपाईसाठी केला प्रशासनाकडे पाठपुरावा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : तालुक्यातील मौजा – मुडझा येथील गाव तलाव आज गुरुवारला पहाटे ५ वाजताच्या दरम्यान संततधार पावसामुळे तुळूमाच्या बाजूने फुटला. यामुळे तुडुंब भरलेल्या तलावातील संपूर्ण ७ हेक्टरमधील पाणी वाहून गेले. तलाव फुटल्याची माहिती मिळताच शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्रीताई जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी प्रत्यक्ष तलावावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून नुकसानग्रस्त शेतकरी आणि ढिवर समाजाचे मच्छीमार यांच्या नुकसानीचे पंचनामे नुकसान भरपाई तातडीने मिळण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, तलाव फुटल्याच्या आपत्तीमुळे गावातील कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी तलावाच्या लाभक्षेत्रातील ५० हेक्टर पेक्षा अधिक शेतातील नुकतेच रोवणे केलेले धानपिक खरडून वाहून गेलेले आहे. तर मुडझा गावातील ८० हून अधिक भूमिहीन – अल्पभूधारक ढिवर समाजाच्या मच्छीमारांनी वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्था, मुडझा अंतर्गत सदर तलावात चालू हंगामाकरीता नव्याने सोडलेले दिड लाख रुपये किंमतीचे मत्स्यबीज आणि मागील हंगामातील पालन केलेली प्रती नग २ किलोहून अधिक वजनाची २ टनांहून अधिक विक्रीयोग्य मच्छी वाहून गेली. या आपत्तीमुळे ढिवर समाजाच्या मच्छीमारांपुढे उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे सदर आपत्तीची आपल्या स्तरावरुन गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकरी आणि वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्था, मुडझा यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे होवून जिल्हा प्रशासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, महिला नेत्या जयश्रीताई जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्था, मुडझाचे अध्यक्ष लक्ष्मण शेंडे, डंबाजी भोयर, सचिव खुशाल मेश्राम, रिपब्लिकन कार्यकर्ते विजय देवतळे आणि मुडझा येथील ढिवर बांधवांनी यांनी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here