The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ०३ : गडचिरोली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने पंचायत समिती गटसाधन केंद्र धानोरा अंतर्गत इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीला शिकविणाऱ्या शिक्षकांची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण एक दिवसीय कार्यशाळा गट शिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात पार पडली.
इयत्ता आठवी व दहावीच्या शिक्षकांची एक दिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळा व पाचवीला अध्यापन करणार्या शिक्षकांची कार्यशाळा शनिवारला पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य विजय सुरजुसे यांच्या हस्ते झाले. प्रशिक्षणार्थी शिक्षकांना राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाचे तालुका समन्वयक मधुकर सहारे, सुलभक देवेंद्र लांजेवार, मंगेश गद्देवार, ए. जी. वेलादी, प्रशांत साळवे, संगीता भडके यांनी मार्गदर्शन केले. तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीला शिकविणाऱ्या शिक्षकांनी सहभाग घेतला.
कार्यशाळेमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीमध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची जिल्ह्याची सद्यःस्थिती, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण निकाल कसा तयार करतात, २०२१ च्या निकालाचे विश्लेषण, गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणमध्ये का मागे आहे? याचे चर्चात्मक विश्लेषण, गुणवत्ता उंचावण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, अध्ययन निष्पत्ती व अध्ययन अनुभव यांची सांगड, अध्ययन निष्पत्तीची ओळख व इयत्ता निहाय वर्गीकरण, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण वर आधारित प्रश्न कसे तयार करावे, याबाबत कृतीपूर्ण सादरीकरण करण्यात आले.
कार्यशाळेत भाषा, गणित, विज्ञान व सामाजिकशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षकांच्या गटनिहाय कृती व सादरीकरण करण्यात आले. सहभागी प्रशिक्षणार्थी शिक्षकांची कार्यशाळा पूर्व व उत्तर चाचणी घेण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन संगीता भडके तर आभार शर्मिष्टा धाईत यांनी मानले. कार्यशाळेला धानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वर्ग तिसरी, पाचवी, आठवी व दहावी ला शिकविणारे शिक्षक उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora )