– सक्षम ज्ञान व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था गडचिरोली व केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने
The गडविश्व
ता.प्र / चामोर्शी, दि. १३ : स्थानिक केवळरामजी हरडे महाविद्यालयात सक्षम ज्ञान व शैक्षणिक बहुउद्देशीय संस्था गडचिरोली व केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. सदर दिनानिमित्त महाविद्यालयात जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
भारताचे भविष्य युवा मतदार व भारताच्या विकासात युवकांचे योगदान असे या या स्पर्धेचे विषय होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्यात सिद्धी उपाध्ये प्रथम, स्मिता बुरांडे द्वितीय तर आयुष मुळे याने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक रक्कम प्रथम ३ हजार रुपये, द्वितीय २ हजार रुपये तर तृतीय १ हजार रुपये व सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे सक्षम संस्थेतर्फे देण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.जोशी, प्रमुख पाहुणे म्हणून सक्षम ज्ञान चे अध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी डॉ.जोशी यांनी स्वामी विवेकानंद हे युवकांसाठी कसे प्रेरणास्थान आहेत व त्याच वेळी जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये काय योगदान दिले यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सक्षम ज्ञान चे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सक्षम ज्ञान ही संस्था युवकांसाठी कशाप्रकारे कार्य करते याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी व्यासपीठावर प्राध्यापक दांडेकर, प्राध्यापक सदावर्ते, सक्षम ज्ञान संस्थेचे उपाध्यक्ष रतन दुर्गे, सचिव आशिष सोमनकर, सदस्य अभिषेक सातपुते, उज्वल सीडाम, कल्याणी गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये व कल्याणी गायकवाड, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशीष सोमनकर यांनी केले व आभार रतन दुर्गे यांनी मानले.