The गडविश्व
गडचिरोली, १० जून : माँ दंतेश्वरी दवाखाना, सर्च चातगाव येथे लकव्याचे रुग्ण आणि लहान मुलांमध्ये जन्मतः शारीरिक विकास कमी असणे, बौद्धिक विकास कमी असणे व त्यामुळे होणारे आजार आणि जन्मतः अपंगत्व येणे यासाठी विशेष न्यूरो-फिजिओथेरपी सेवा सुरू करण्यात आली आहे. या फिजिओथेरपी सेवांमध्ये स्नायूंचा ताठपणा कमी करून लवचिकता वाढवणे, चालतांना ज्यांचा तोल जातो त्यांना विशिष्ट प्रकारचे व्यायाम शिकविणे, लकव्यामुळे स्नायू कमजोर होणे आणि त्यावर मशीनद्वारे उपचार करून ताकत वाढविणे, तसेच रोजच्या कामांमध्ये लागणारी शाररीक ताकत वाढविणे, स्नायूंचे संतुलन आणि त्यासाठी लागणारे उपचार देणे या प्रकारच्या सेवा फिजिओथेरपी विभागा अंतर्गत दिल्या जात आहेत.
फिजिओथेरपी उपचारात सांध्याचे दुखणे, स्नायूंचे दुखणे, लचक भरणे, नस लागणे, ऑपरेशन नंतर दैनंदिन जीवनात येणार्या शारीरिक अडचणी दूर करणे यावर सुद्धा फिजिओथेरपी उपचार उपयुक्त ठरतो. औषधोपचारा बरोबरच फिजिओथेरपीला विशेष महत्व मिळाले आहे.
न्यूरो-फिजिओथेरपी सेवेचा लाभ घेण्यासाठी दवाखान्यात तपासणी केली जाते, त्यानंतर तज्ञांच्या मार्फत फिजिओथेरपी सेवा दिली जाते. उपचारासाठी दवाखान्यात राहण्याची व्यवस्था अत्यंत छान व अल्प दरात उपलब्ध आहे.
तरी या फिजिओथेरपी सेवांचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन सर्चचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता भलावी आणि संचालिका डॉ. राणी बंग यांनी केले आहे.