–नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना गावात प्रचारास गावबंदी करण्याचा आक्रामक पवित्रा
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०४ : तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या ग्रामपंचायत गोठणगाव येथील शेकडो नागरिकांनी, विजेच्या अत्यल्प दाबाला कंटाळून येत्या लोकसभेच्या निवडणूकीवर सामुहिक बहिष्कार टाकू असे निवेदन उपविभागीय अधिकारी कुरखेडा यांचे मार्फतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना शेकडो ग्रामस्थांच्या नावे आणि सह्यांनी ३ एप्रिल २०२४ ला देण्यात आले.
अनेक दिवसांपासून गोठणगाव तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये विजेच्या अत्यल्प दाबामुळे शेतकरी व गावकरी बेहाल व त्रस्त आहेत. विद्युत विभागाला आणि या क्षेत्रातील आमदार व खासदार यांना अनेकदा याची कल्पना देऊन सुद्धा कुणीही लक्ष घालत नसल्याने ग्रामस्थांनी टोकाची भूमिका घेतली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शासन स्तरावरून भारनियमन संबंधित कोणत्याही प्रकारची घोषणा नसताना कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव व आजूबाजूच्या गावांमध्ये सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजता पर्यंत भारनियमन चे नाव पुढे करून महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज खंडित करून ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची पिळवणूक केलेली आहे. त्याचप्रमाणे इतर वेळी कमी दाब असलेली वीज देऊन गावकऱ्यांचे शेतातील मोटार पंप, घरातील पंखे, फ्रीज आणि मुख्येत्वे गावातील नळ योजनेची मोटरपंप निकामी होऊन खूप मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. नळ योजना ठप्प पडल्यामुळे गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपिटा करावे लागत आहे. त्याचप्रमाणे महावितरण कंपनीने ऐन वेळेवर १२ तास भारनियमन करून व अत्यंत कमी दाबाची वीज पुरवठा करीत असल्यामुळे गावकऱ्यांची ५० टक्के शेतकऱ्यांची पाण्याअभावी पिके करपली असून रब्बी पिके मारण्याच्या तयारीत आहेत. शासनाने “हर घर जल” ही घोषणा करून स्वतःचा नावलौकिक केला पण गावकरी मात्र पाण्याविना व विजेविना होरपळत आहेत. नवजात जन्मलेल्या बाळाला सरकारी दवाखान्यात पंखा किंवा कुलर ची हवा शासन लगेच पुरवितो. मात्र तोच बाळ घरी आल्यानंतर त्याचे बाप म्हणून ते कर्तव्य पूर्ण करू शकत नाही. ही आमची
खेड्यात राहणाऱ्या बापाची शोकांतिका आहे. एकीकडे लोकशाही म्हणते की, आपल्या जनतेला अन्न, वस्त्र, व निवारा या मूलभूत गरजा मिळणे महत्वाचे आहे. पण यात वीज ही मूलभूत गरज नाही काय? अशी व्यथा ग्रामस्थांनी निवेदनातून मांडली. विजेशिवाय पाणी आणि पाण्याशिवाय अन्न बनुच शकत नाही. त्यामुळे आम्हा गावकऱ्यांना अखंडित व चांगल्या दर्जाची वीज देऊन आम्हचे होणारे हाल दूर करावे. अशीही व्यथा मांडण्यात आली.
तर ग्रामस्थांनी, वरील मागण्या २४ तासाच्या आत पूर्ण झाल्या नाहीत तर आम्हाला शासनाकडून मिळत असलेल्या शिक्षण आरोग्य, महसूल, व इतर सोई सुविधांचा त्याग करून होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू तसेच निवडणुकीच्या प्रचाराकरिता येणाऱ्या कोणत्याही उमेदवारांच्या गाड्या अथवा कोणत्याही पक्षाचा उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही असा इशारा निवेदनातून ग्रामस्थांनी दिला आहे. उपविभागीय अधिकरी हे उपस्थित नसल्यामुळे नायब तहसीलदार श्रीमती बोके यांचे कडे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना दिनकर माकडे, मोहन पाटील कुथें, विठ्ठल प्रधान, प्रकाश तुपट, राधेश्याम बोडले, कवडू मारगाये, प्रदीप माकडे, लालाजी मांडवे, श्यामसुंदर पटने, मयूर दोनाडकर, वामन पाटणकर, गोपाल दोनाडकर, दुर्गेश मेश्राम तथा ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिस असोसिएन चे गडचिरोली मुख्य प्रचार प्रमुख पूर्णानंद नेवारे हे उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #kurkheda #mahavitaran #loksabhaelection2024 #loksabha_election2024 )