वनविभागात कुणीही अस्थायी राहणार नाही…

62

– वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
The गडविश्व
नागपूर, दि. १० : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले असता, महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि महाराष्ट्र राज्य वनमजूर, वनकामगार व क्षेत्रीय कर्मचारी संघटना यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या भेटीत वनरक्षक, वनपाल, बारमाही व हंगामी वनमजूर, संगणक चालक आणि वाहन चालक यांच्या सेवा व समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत वनपालांना एस-१४ (₹३८,६०० – ₹१,२२,८००) आणि वनरक्षकांना एस-९ (₹२६,४०० – ₹८३,६००) वेतनश्रेणी मिळावी, सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस आरोग्य सेवा लागू करावी, वनरक्षक व वनपाल यांना गस्तीकरिता दुचाकी वाहने पुरवावीत, तसेच हंगामी व बारमाही वनमजूर, संगणक चालक आणि वाहन चालक यांना कायम करण्यात यावे, यांसारख्या अनेक मागण्या मांडण्यात आल्या. स्थायी वाहन चालकांना गणवेश भत्ता लागू करावा, वाहन चालकांना पदोन्नतीनंतर खांद्यावर एक स्टार लावण्याची परवानगी द्यावी आणि कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी विश्राम कक्ष तयार करण्यात यावेत, अशा मागण्यांचाही यात समावेश होता.
या सर्व मागण्यांवर वनमंत्री नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, “वनविभागात यापुढे कुणीही अस्थायी राहणार नाही. सर्व हंगामी कर्मचारी, संगणक चालक, वाहन चालक यांना लवकरच स्थायिक करण्यात येईल,” असे ठोस आश्वासन दिले. तसेच वनरक्षक व वनपाल यांना गस्ती दरम्यान वापरण्यासाठी दुचाकी वाहने लवकरच पुरवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. इतर मागण्यांवरही लवकर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णायक बैठकीला संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष माधव मानमोडे, गडचिरोली वनवृत्त अध्यक्ष सिद्धार्थ मेश्राम, नागपूर वनवृत्त अध्यक्ष आनंद तिडके यांच्यासह राजेंद्र कोडापे, रूपेश मेश्राम, विजय घोडवे, गंगाधर मुसळे, समीर नेवारे, ममता भोसले, ललिता वरघट, रेखा राठोड आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत झालेली चर्चा आणि वनमंत्र्यांनी दिलेले आश्वासन हे वनविभागातील असंख्य कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारे ठरले आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत आता निर्णायक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here