The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १८ : तालुक्यातील चरवीदंड, पालापुंडी येथील शक्तिपथ संघटनेच्या महिलांनी गावात दारूबंदी मशाल रॅलीच्या माध्यमातून दारूविक्रेत्यांच्या घरी भेट देऊन अवैध व्यवसाय बंद करण्याची ताकीद दिली होती. तरीसुद्धा चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री करणाऱ्या चरवीदंड येथील विक्रेत्यांच्या घर परिसराची पाहणी करून ३५ लिटर मोहफुलाची दारू, मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची कृती चरवीदंड, पालापुंडी येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी केली.
चरवीदंड येथे गावातील महिलांची सभा ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तंमुस अध्यक्ष मोतीराम मडावी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये दारूमुक्त गाव निर्माण करण्यासाठी समिती नेमण्यात आली. त्यानंतर अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन दारूविक्रेत्यावर ५० हजार रुपये दंड, ग्रामपंचायत द्वारे शासकीय दाखले व कागदपत्रे बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. महिलांच्या निर्णयाचे स्वागत करीत तिन्ही गावातील पोलीस पाटील, तंटामुक्त समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी महिलांना पूर्ण पाठिंबा दिला व स्वतःही दारूमुक्त समितीमध्ये सहभागी झाले. सभेत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करीत चरवीदंड, पालापुंडी गावातील महिलांनी दारूबंदीची मशाल रॅली काढत दारूविक्रेत्यांच्या घरी भेट दिली. त्यांना समज देत तत्काळ दारूविक्रीचा अवैध व्यवसाय थांबविण्याचे आवाहन केले. तसेच सूचनेचे पालन न करता दारूविक्री केल्यास सभेच्या निर्णयानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे ठणकावून सांगण्यात आले होते. गावातील विक्रेत्यांनी सुद्धा अवैध दारूविक्रीचा व्यवसाय थांबविला होता. परंतु, काही विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री करण्यासाठी घरी हातभट्टी लावली असल्याची माहिती गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. त्यानुसार चरवीदंड, पालापुंडी येथील गाव संघटनेचा महिला व मुक्तिपथ तालुका चमूने गावातील प्रत्येक दारू विक्रेत्यांच्या घर परिसराची पाहणी केली. या कृतीमध्ये एकूण ३५ लिटर मोहाची दारु, मोह सळवा तसेच साहित्य नष्ट करण्यात आला. तसेच पुन्हा दारूविक्री करताना आढळून आल्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात य येईल, असाही इशारा देण्यात आला.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolilocalnews #muktipath )