मेंढा येथे अहिंसक कृती ; 35 लिटर दारू नष्ट

102

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : तालुक्यातील मेंढा येथे दोन दारू विक्रेत्यांकडून 35 लिटर मोहफुलाची दारू जप्त करून नष्ट केल्याची कृती मुक्तीपथ व गाव संघटनेने संयुक्तरित्या केली. गावातून अवैध दारू हद्दपार करण्यासाठी युवकांचे सहकार्य देखील लाभत आहे.
गडचिरोली तालुक्यात मेंढा या गावात जेमतेम 4 ते 5 दारू विक्रेते आहेत. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था, आरोग्य, आर्थिक नुकसान, युवक यांच्यात वाढलेले व्यसन, अपघात या सारखे मोठ्या गंभीर समस्या बघता गाव संघटन व मुक्तीपथ तालुका टीम एकत्र येत दारू बंदीसाठी चर्चा करून दारू बंदीचा निर्णय घेण्यात आला. विक्रेत्यांना अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचना करूनही काही विक्रेत्यांनी दारूविक्री सुरूच ठेवली. तसेच नजीकच्या चांदाळा, रानभूमी , घोटेविहिर, सिताटोला येथील विक्रेते मेंढा गावातील रस्त्याहून अवैध दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळताच गाव संघटनेने दारूविक्रेत्यांवर पाळत ठेवली आहे. दरम्यान, मुक्तीपथ, गाव संघटन व युवकांनी अहिंसक कृती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एका दारूविक्रेत्याच्या घरातून 15 लिटर मोहफुलाची दारू जप्त करून नष्ट करण्यात आली व पुन्हा अवैध दारूविक्री न करण्याची तंबी देण्यात आली. तसेच गावातून दारूची वाहतूक करणाऱ्या गडचिरोली येथील एका इसमाकडून 20 लिटर दारू जप्त करून चांगलाच चोप देण्यात आला.
मेंढा गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तीपथच्या मार्गदर्शनाखाली गाव संघटनेकडून प्रयत्न केले जात आहेत. गावातील विक्रेत्यांवर गाव संघटनेची नजर असून विक्री करताना आढळून आल्यास कृती केली जात आहे. गावातील युवकांनी देखील सहभाग घेत मेंढा येथील सुंदरनगरातून अवैध दारू हद्दपार केली आहे. आपल्या गावाला अवैध दारूपासून मुक्त करणारच असा निर्धार संघटनेने केला आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here