The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : चातगाव येथील सर्च रुग्णालयात २० जुलै २०२४ रोजी हृदयविकार व संधिवात ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या ओपीडीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ह्रदयरोग असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, व्यायामाचा अभाव, तणावपूर्ण आयुष्य, धुम्रपान, तंबाखू, गुटखा यांसारखे व्यसन अशा कारणांमुळे हृदयविकार वाढत आहेत. जन्मजात हृदयाला छिद्र असते, त्याला हार्ट डिसीज म्हणतात. त्याबरोबरच हार्ट अटॅकमुळे होणार्या मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे. हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिनीत रक्तपुरवठा बंद पडणे. काळाची गरज समजून सर्च रुग्णालयात विशेषज्ञ हृदयरोग ओपीडी नियोजित करण्यात आलेली असून हृदयरोगतज्ञ डॉ. सतिश पोशेट्टीवार तपासणी करणार आहेत. ह्रदयरोगाचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी सोबतच (२डी इको व टी.एम.टी) तपासण्या केल्या जातील.
संधिवाताच्या आजाराची अनेक लक्षणे आहेत जसे -सांधे, स्नायू, हाडे यांच्या आसपास वेदना, सूज आणि/किंवा कडकपणा, मान आणि पाठदुखी,प्रदीर्घ ताप, त्वचेवर पुरळ उठणे, थकवा येणे, वारंवार तोंडात फोड येणे, केस गळणे, प्रकाश संवेदनशीलता. हात, पाय, चेहरा, छाती किंवा पोटावर त्वचा घट्ट होणे. डोळे आणि तोंड कोरडे पडणे, थंड स्थितीत बोटे/ हाताचे पंजे निळे किंवा पांढरे होणे,जिने चढल्याने स्नायू कमकुवत होणे. संधिवात ओपीडी दर महिन्याच्या तिसर्या शनिवारी नियोजित असून, संधिवात विकारतज्ञ डॉ. सलील गाणू यांच्याकडून रुग्णांची तपासणी करण्यात येईल.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे, प्रयोगशाळा तपासणी, २डी इको व टी.एम.टी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत प्रदान करित आहे. विशेष म्हणजे १५ वर्षाखालील सर्व लहान मुलांना सर्च रुग्णालयात कोणतेही शुल्क आकारले जात नाही. नोंदणी फी, प्रयोगशाळा तपासणी, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी या १००% मोफत दिल्या जातात. तरी शनिवार दिनांक- २० जुलै रोजी होणार्या हृदयविकार व संधिवात ओपिडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )