२२ मार्च ला ‘मोऱ्या’ चित्रपट मराठीसह तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार

205

The गडविश्व
मनोरंजनविश्व / मुंबई,दि १८ : शहराची स्वच्छता राखण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अनेकदा चर्चा होते. पण त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी मात्र आजही तशाच आहेत. यावर प्रकाश टाकणारा सफाई कर्मचाऱ्यांची व्यथा दाखविणारा मोऱ्या हा अत्यंत वेगळा चित्रपट मराठीसोबतच हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड या भाषांमध्ये येत्या २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होत आहे. सेंसॉर बोर्डासोबत प्रदीर्घ संघर्ष करून हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने तमाम रसिकांमध्ये मोऱ्या बद्दल विशेष कुतूहल निर्माण झाले आहे.
एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा ‘मोऱ्या’ या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी खास मेहनत घेतली आहे. त्यांनी केलेला नैसर्गिक अभिनय तंतोतंत सफाई कर्मचाऱ्यांचं आयुष्य उभं करतं. विषयाच्या जातकुळीनुसार धुळे जिल्ह्यातील ‘पिंपळनेर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीत करण्यात आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिसराचे सौंदर्य पहिल्यांदाच सर्वांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या निर्मितीसाठी निर्माती तृप्ती कुलकर्णी, राजेश अहिवले, सहनिर्माते प्रेरणा धजेकर, पूनम नागपूरकर, मंदार मांडके, राहुल रोकडे, सचिन पाटील यांची खंबीर साथ लाभली आहे.
‘टॉर्टुगा मोशन पिक्चर्स’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एका सफाई कर्मचाऱ्यांची हृदयस्पर्शी कथा रेखाटण्यात आली असून ती अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी आपल्या सहजसुंदर नैसर्गिक – संयमी अभिनयाने हुबेहूब उभी केली आहे. प्रमुख सहकलाकार उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, बालकलाकार रुद्रम बर्डे इत्यादींचा अभिनय आहे. संगीतकार-अमोघ इनामदार, गायक अवधूत गुप्ते तर DOP आकाश काकडे आहेत. सहाय्यक दिग्दर्शन श्रेयस गौतम, करण मोरे यांचे आहे. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविणारा ‘मोऱ्या’ २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन सर्वांनी पहावा आणि मराठी अस्मिता जागवावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here