The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. २७ : कुरखेडा तालुक्यातील ग्रामीण भाग सध्या वीज कपातीच्या भीषण संकटात सापडला आहे. सकाळी ८:३० वाजता वीज गायब होते आणि दुपारी केवळ एका तासासाठी पुन्हा मिळते. नंतर संध्याकाळी पुन्हा अंधाराचे राज्य पसरते. सात तास वीज विना होरपळणाऱ्या जनतेला प्रशासनाने पूर्णतः वाऱ्यावर सोडले आहे.
“आम्ही किती काळ उकाडा सहन करायचा?” असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. लहान मुले, वृद्ध, गृहिणी, शेतकरी आणि छोटे व्यापारी सर्वच वीज अभावी हालअपेष्टा सहन करत आहेत. घरात पंखे-कूलर बंद, रात्री मच्छरांचा त्रास, दिवसा तापमानात वाढ – ही ग्रामीण जनतेची रोजची भयावह स्थिती झाली आहे.
वीज नसल्याने सिंचन ठप्प झाले असून, शेतकऱ्यांच्या पिकांवर कोरडा मृत्यू ओढवतो आहे. फवारणी न झाल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. “रात्री जागरण, दिवसा उकाडा, पिकांचे नुकसान… आम्ही किती परीक्षा द्यायच्या?” असा सवाल रस्त्यावर येऊन जनतेने विचारायला सुरुवात केली आहे.
महावितरणकडून वेळापत्रक जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात वीज पुरवठ्याचा कुठलाही ठोस कार्यक्रम दिसून येत नाही. तांत्रिक बिघाड, वादळ, दुरुस्तीच्या नावाखाली ग्रामीण भागातील वीज सतत बंद ठेवली जात आहे.
नागरिकांनी महावितरण आणि प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त करत तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
उन्हाचा पारा चढतोय, संतापाचा उकळाही वाढतोय… पण प्रशासन अजूनही गाढ झोपेत आहे!.
