– विजेत्यांचा मंडळातर्फे गौरव
The गडविश्व
गडचिरोली, २८ सप्टेंबर : शहरातील आरमोरी मार्गावरील लोकमान्य गणेश मंडळाच्या वतीने रविवार २४ सप्टेंबर ला इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचा निकाल मंडळाच्या वतीने घोषित करण्यात आला असून स्पर्धेतील विजेत्यांचा मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला.
लोकमान्य गणेश मंडळातर्फे घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत १६५ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला होता. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पारितोषिक ठेवण्यात आले होते. यात प्रथम पारितोषिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुल शाळेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी तारका रंजन रामटेके, द्वितीय पारितोषिक शिवाजी हायस्कूलचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी आर्यन ज्ञानपाल शेंडे तर तृतीय पारितोषिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च प्राथमिक शाळेचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी राज मनोज कोटगले याने पटकाविला. दरम्यान सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना लोकमान्य गणेश मंडळाच्या वतीने अनुक्रमे ३००१, २००१ व १००१ रुपये रोख व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकमान्य गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. यंदा रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी व सिकलसेल तपासणी शिबीर, विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा, तसेच दहाही दिवस विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
गुरुवार २८ सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणूक रात्रोच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात काढण्यात येणार आहे असेही यावेळी गणेश मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.