The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. ३१ : येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका कुमारी रजनी मडावी यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम ३१ मार्च २०२५ रोजी जिल्हा नियोजन भवन येथे संपन्न झाला.
अखिल भारतीय राष्ट्रीय महासंघ, नवी दिल्ली संलग्नीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म जयंती उत्सवाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील कर्तबगार महिला शिक्षिका व कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंसेविकांना सन्मानित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद हायस्कूल, धानोरा येथील शिक्षिका कु. रजनी गुरूदास मडावी यांना सामाजिक, सांस्कृतिक आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल “आदर्श शिक्षिका पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माजी आमदार देवराव होळी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंफा अंबादे (जिल्हा महिला आघाडी प्रमुख, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, गडचिरोली) होत्या. तसेच मिलिंद रामजी नरोटे (आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र), भिखाभाई पटेल (उपाध्यक्ष, अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षक महासंघ, नवी दिल्ली), मधुकरजी उन्हाळे (प्रांताध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, प्राथमिक विभाग) आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, मुख्याध्यापक व्ही. एम. सुरजुसे, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वेणूताई मशाखेत्री, उपाध्यक्ष जमीर कुरेशी तसेच इतर शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि पालकवर्गाने कु. रजनी मडावी यांचे अभिनंदन केले.
