– जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २ डिसेंबर : तालुक्यातील सावंगा (बु) हे गाव नक्षलग्रस्त व अतिदुर्गम क्षेत्रात येत असून विकासापासून कोसो दूर आहे. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा या क्षेत्रातील विकास कामे झालेले नाहीत. गावापर्यंत मुलभुत सुविधा पोहचलेल्या नाहीत. त्यामुळे सावंगा( बु) ग्रामपंचायत अंतर्गत येनाऱ्या गावांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने नक्षलग्रस्त भागाचा जलद गतीने विकास कार्यक्रम आखून कामानां मंजुरी देवून निधि उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना ३० नोव्हेबर २०२२ ला दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पयडी ते हालकन्हार- मोरचुल रस्त्याच्या मोठ्या नाल्यावर ब्रिज तयार करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, सावंगा (बु), मंगेवाडा, कनेली ते चुटिंगटोला-बोटेहूर रस्त्यावर मोठ्या नाल्यावर ब्रिज तयार करून रस्त्याचे डांबरीकरण करणे, हालकन्हार ते मोरचुल रस्त्यावर RCW बांधकाम करणे, ग्रामपंचायत सावंगा (बु) अंतर्गत सावंगा (बु) सावंगा (खु) हलकणार, मोरचुल, कनेली येथील सामूहिक वन हक्क दावे मोजणी करिता आदेशित करण्यात यावे, सावंगा (बु) येथे कृषी गोडाऊन मंजूर करण्यात यावे या सर्व कामांना प्राधान्याने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सावंगा (बु) चे सरपंच, उपसरपंच तसेच गावकरी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. सदर निवेदनाची प्रत खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, पोलीस अधीक्षक गडचिरोली, उपविभागीय पोलीस अधिकारी कारवाफा कॅम्प पेंढरी तालुका धानोरा यांना पाठवण्यात आली आहे.