– जप्त वाहनावर नंबरच नाही
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०३ : तालुक्यातील मुरूमगाव येथे रात्रो ११.३० वाजताच्या सुमारास नाल्यातील रेती अवैधरित्या जेसीबीने उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरतांना महसूल विभागाने जेसीबी आणि ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई केली आहे. सदर कारवाईने अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जप्त गाडी वर नंबरच नाही असे दिसून येत आहे.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, धानोरा येथील महसूल विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे येथील चमुने २ मार्च २०२५ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रामपुर रोड वरील नाल्यातून अवैधरित्या जेसीबीने रेती उपसा करून वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाचे पथक मुरूमगाव येथे पोहचले. त्याठिकाणाहून दोन किलोमीटर अंतरावरील रामपुर मार्गावरील नाल्यावर पोहोचले आणि नाल्यातून अवैध रेती जेसीबी उपसा करणारी जेसीबी आणि वाहतूक करणारी ट्रॅक्टर लगेच जप्त करून धानोरा येथील तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आले. सदर दोन्ही गाड्या वर नंबर प्लेट दिसुन येत नाही. यामुळे धानोरा तालुक्यातील रेती तस्करी करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणलेअसून सदर जेसीबी सागर हरिराम कवाडकर रा. मुरूमगाव यांच्या मालकीची तर ट्रॅक्टर मालक रुपेश सोमसिंग हिडको रा.रामपूर असल्याची माहिती पथकाने दिली आहे.सदर कारवाई तहसीलदार अविनाश शेंबटवाड, नायब तहसीलदार अल्पेश बारापात्रे, दिलीप डोंगरे तलाठी (दुधमाळा) वाहन चालक आशिष पोरेडीवार व महसूल सेवक आशिष पोरेटी यांच्या पथकाने कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या वाहनावर दंड ठोठावण्यात आला असून जेसीबीवर साडेसात लाख (७,५०,०००/- ) तर ट्रॅक्टरवर एक लाख अठरा हजार सहासे रुपये (१,१८,६००/- ) रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
कारवाई मध्ये जप्त करण्यात आलेल्या वाहनावर नंबरच नसल्याने अवैध रेती तस्कर नंबर नसलेले वाहन वापरून आपला व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत असून अशा क्लुप्त्यांमुळे परिवहन विभागालाहि सावध होणे आवश्यक आहे.
