– शेकाप तर्फे शिवणी येथे मोफत चष्मे वाटप
The गडविश्व
गडचिरोली, १९ ऑक्टोबर : सध्याचे सरकार सामान्य माणसासाठी नव्हे तर अदानी – अंबानीच्या फायद्यासाठी काम करीत असल्याने सरकारने आरोग्य व्यवस्थेकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर आणि औषधांचा तुटवडा निर्माण होवून आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई जराते यांनी केला.
तालुक्यातील शिवणी येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप शिबिरादरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, आदिवासी विकास युवा परिषदेचे विनोद मडावी, पुरोगामी युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, शेकाप गाव शाखेचे चिटणीस वसंत चौधरी, विनोद गेडाम, उमाजी मुनघाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य वैशाली ताटपल्लीवार, किशोर गेडाम, कवींद्र देशमुख, विनोद मोहुर्ले, पोलीस पाटील कालिदास राऊत, तमुंस अध्यक्ष निलकंठ पेंदाम, एकनाथ मानकर, सुरेश गेडाम, चंद्रकांत भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
राजकारणाचे व्यावसायिकरण झाल्याने आता गरिबांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रस्थापित पक्षांना वेळ नाही. मात्र शेतकरी कामगार पक्ष सदैव गरीबांच्या कल्याणासाठी सातत्याने झटत असल्याचेही जयश्रीताई जराते यांनी सांगितले.
यावेळी ८१ रुग्णांना चष्मे व ३१ रुग्णांना औषधीचे मोफत वाटप करण्यात आले. शिवणी गावात मोतीबिंदूचे ४५ रुग्ण आढळून आले. तपासणी सेवावृत्त डॉ.नानाजी मेश्राम यांनी केली. आकाश आत्राम, रेवनाथ मेश्राम, बादल दुधे, वैभव मानकर आणि शेकाप गाव शाखेच्या कार्यकर्त्यांनी शिबिराकरीता परिश्रम घेतले.