नवजीवनाची संजीवनी : गडचिरोली पोलीस दलाकडून आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी ‘प्रोजेक्ट संजीवनी’ची सुरुवात

30

The गडविश्व
गडचिरोली, दि.१५ : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या सर्वांगीण पुनर्वसन व कौशल्य विकासासाठी ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ आज १४ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आला. यावेळी चार आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी स्वतंत्र रो-हाऊसच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सन २००५ पासून शासनाच्या आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत अनेक माओवादी कार्यकर्त्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांततेचा स्वीकार केला आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी अभियानांमुळे आजपर्यंत ७०४ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, केवळ २०२२ पासून आतापर्यंत ५५ जहाल माओवाद्यांनी शस्त्र टाकली आहेत. यंदाच्या वर्षात म्हणजे २०२५ मध्ये २२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
प्रोजेक्ट संजीवनी अंतर्गत आत्मसमर्पणानंतर केंद्र व राज्य शासनाच्या योजनांतील लाभांचे सुलभ वितरण, भूखंड उपलब्ध करून देणे, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजनेतून घरांचे निर्माण, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड, जॉब कार्ड आदी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे. तसेच मोटार ड्रायव्हिंग, शिवणकाम, ब्युटीपार्लर, पशुपालन आदी क्षेत्रांत प्रशिक्षण आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये वेल्डर, टेक्निशियन, ऑपरेटर इ. नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांची स्थापना, वैद्यकीय मदतीसाठी “ऑपरेशन रोशनी” अंतर्गत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, तसेच मानसिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी समुपदेशन व ध्यान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचेही आयोजन होणार आहे.
या उपक्रमाच्या प्रारंभप्रसंगी गडचिरोली येथे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी चार स्वतंत्र रो-हाऊसेसच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) विनोद चव्हाण, स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे, जिवीशाचे पोनि. निखिल फटींग, पोस्टे गडचिरोलीचे पोनि. रेवचंद सिंगनजुडे तसेच विविध शाखांचे अधिकारी, कर्मचारी आणि ५० पेक्षा अधिक आत्मसमर्पित माओवादी सदस्य उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने समाविष्ट होता येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी पोउपनि. नरेंद्र पिवाल आणि त्यांच्या टीमने विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here