– शेकडो नागरिक रक्तदानासाठी सज्ज
The गडविश्व
ता.प्र/ देसाईगंज, दि. २४ : संत निरंकारी मंडळाच्या देसाईगंज (वडसा) शाखेच्यावतीने उद्या शुक्रवार 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत संत निरंकारी सत्संग भवन, आरमोरी रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या प्रेरणेने व जिल्हा रक्तपेढी आणि जिल्हा रुग्णालय, गडचिरोली यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंना वेळेवर रक्त मिळावे या उद्देशाने संत निरंकारी मंडळ अनेक वर्षांपासून सामाजिक सेवेचे हे कार्य सातत्याने करत आहे.
मंडळाचे झोनल इंचार्ज किशन नागदेवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरात 250 ते 300 नागरिक – महिला व पुरुष – उत्स्फूर्तपणे रक्तदान करणार आहेत. त्यांनी सर्व मानवप्रेमी नागरिकांना या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मागील पाच वर्षांतही, कोविड महामारीच्या कठीण काळात मंडळाने प्रशासनाच्या विनंतीवरून रक्तदान शिबिरे आयोजित करत 160, 130, 170, 254 आणि 188 युनिट्स रक्त जिल्हा रुग्णालयाला पुरवले होते.
या वर्षीच्या शिबिरासाठी जनजागृतीच्या उद्देशाने 24 एप्रिल रोजी संत निरंकारी सेवादलाच्या वतीने शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत 100 पेक्षा अधिक गणवेशधारी महिला व पुरुष सेवादल सदस्य सहभागी झाले होते.
संत निरंकारी मंडळाच्या सामाजिक उपक्रमातून देसाईगंज परिसरात एक सकारात्मक आणि मानवसेवा प्रधान वातावरण निर्माण होत असून, रक्तदानाच्या माध्यमातून जीवनदानाचे कार्य करण्यात येत आहे.
