– पोेलिसांकडून आरोपीस अटक, मध्यवर्ती कारागृहात रवानगी
The गडविश्व
नागपूर, दि. १५ : शहरातील हुडकेश्वर परिसरात गेल्या १५ वर्षांपासून मानसोपचार तज्ज्ञ म्हणून उपचार करणाऱ्याने शेकडो महिला महिलांचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून लैंगिक शोषण केलेल्या पीडितांमध्ये मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचा समावेश असल्याचे कळते. आरोपी मानसोपचार तज्ज्ञ हा अश्लील चित्रफिती तयार करून त्यांना ‘ब्लॅकमेल’ करीत वारंवार शारीरिक संबंध ठेवायचा मात्र तीन पीडित मुली व महिलांनी त्या कथित मानसोपचार तज्ज्ञाविरुद्ध लेखी तक्रार दिली असता हुडकेश्वर पोेलिसांनी त्याला अटक करून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे.
आरोपी मानसोपचार तज्ज्ञ राजेश याने १५ वर्षांपूर्वी हुडकेश्वर येथे घरीच मानसोपचार उपचार करण्यासाठी क्लिनिक उघडले होते. तेव्हापासून तो अनेकांवर उपचार करीत होता. अनेकदा तो उपचाराच्या नावाखाली सहलीचे आयोजन करीत होता.मात्र, विकृत वृत्तीच्या राजेशने उपचारासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुली, विवाहित महिला आणि तरुणींशी अश्लील चाळे करायला सुरुवात केली. नैराश्यात असलेल्या पीडिता हा प्रकार सहन करीत होत्या. त्याने अनेक मुलींशी अश्लील चाळे करताना भ्रमणध्वनीद्वारे छायाचित्र आणि चित्रफिती काढल्या होत्या. तसेच काही महिलांशी क्लिनिकमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तो सर्व प्रकार भ्रमणध्वनी लपवून ठेवून चित्रफिती काढत होता. त्यानंतर त्या मुली किंवा महिलांना चित्रफिती दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बाध्य करीत होता. तर अनेकदा तो उपचाराच्या नावावर सहलीचे आयोजन करून यादरम्यान, हॉटेल किंवा फार्महाऊसवर पीडितांवर लैंगिक अत्याचार करीत होता. आतापर्यंत राजेशने अंदाजे शंभरपेक्षा जास्त मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर आल्याचे कळते. दरम्यान काही दिवसांपूर्वी एक महिला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पोहचली व ‘माझे काही अश्लील छायाचित्र फेसबुक आणि इंस्टाग्राम’वर प्रसारित होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली असता पोलिसांनी तपासाची चक्र अधिक गतीने फिरवीत खोलात जाऊन तपास केला असता राजेशचे नाव समोर आले. पीडित विवाहितिने सांगितले की, ‘मी अविवाहित असताना राजेशने माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून चोरून छायाचित्र काढले होते. तेच छायाचित्र दाखवून वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करीत आहे.’ अशी तक्रार केल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.
सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.