-दोन दिवशीय अहिंसक कृतीतून मुद्देमाल नष्ट
The गडविश्व
गडचिरोली,दि.२४ : मुलचेरा तालुक्यातील व अहेरी पोलिस स्टेशन अंतर्गत शांतिग्राम परिसराला अवैध दारूविक्रीमुक्त करण्यासाठी महिलांकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत अनेक दारूविक्रेत्यांना धडा शिकवण्यात महिलांना यश आले आहे. त्याचप्रमाणे होळीचा सण दारूविक्रीमुक्त करण्यासाठी गाव संघटनेच्या महिलांनी मुक्तिपथ तालुका चमूच्या सहकार्याने सलग दोन दिवस अहिंसक कृती करीत १२ ड्रम मोहसडवा व ३० लिटर दारू नष्ट केली आहे.
होळीनिमित्त अवैध दारूची विक्री होऊ शकते, त्यामुळे दारूविक्रीमुक्त गावात पुन्हा दारूची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन मुक्तिपथ व शांतिग्रामच्या महिलांनी अहिंसक कृतीचे नियोजन केले. त्यानुसार पहिल्या दिवशी दामपूर येथील एका विक्रेत्याकडून २० लिटर मोहफुलाची दारू, दोन विक्रेत्यांचा ४० लिटर मोहफुलाचा सडवा व ३० लिटर दारू पकडून अहेरी पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच दुसऱ्या दिवशी सुद्धा शांतीग्रामपासून ७ किमी व अहेरी तालुक्यातील बोरी गावाजवळील नदी किनारी अहिंसक कृती करून ११ ड्रम मोहसडवा नष्ट करण्यात आला. दोन दिवस राबविण्यात आलेल्या अहिसंक कृतीमुळे अवैध दारूविक्रेत्यांचे नुकसान करण्यात महिलांना यश आले. होळीप्रमाणेच इतरही सण दारूविक्रीमुक्त करण्यासाठी गावातील महिला प्रयत्नरत आहेत.