– हत्येनंतर पतीनेही जीवन संपविण्याचा केला प्रयत्न
The गडविश्व
वाशिम, दि. २८ : कार घेण्यासाठी मामाकडे ५ लाखांची मागणी केली, मागणी अपूर्ण राहिल्याने पतीने पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना वाशिम तालुक्यातील वाघजाळी येथे शनिवार २७ जानेवारी रोजी घडली. दरम्यान पती गजानन शिंदे यांनी आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याचे कळते. त्याला वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मेघा उर्फ रेवती गजानन शिंदे रा. वाघजाळी असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी गजानन खंडूजी घुले रा. चिखली बु. यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
गजानन घुले यांची भाची मेघा उर्फ रेवती हिचे लग्न वाघजाळी येथील गजानन बबन शिंदे याच्यासोबत १ जून २०२३ रोजी झाले. पती गजानन शिंदे, सासरे बबन श्यामराव शिंदे, सासू पार्वती बबन शिंदे यांनी कार घेण्याकरिता मामाकडून ५ लाख आणण्याचा तगादा मेघा उर्फ रेवतीकडे लावला होता. या कारणावरून तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. भाचीला होत असलेल्या त्रासाला कंटाळून मामाने मागील दिवाळीपूर्वी चेकद्वारे २ लाख आणि नगदी ५० हजार रुपये दिले होते. तरी सुद्धा सासरच्या मंडळींनी तिला त्रास देणे सुरूच ठेवले होते. दरम्यान, शनिवार २७ जानेवारी रोजी सकाळी गजानन शिंदे याने वाघजाळी येथील राहत्या घरी धारदार शस्त्राने मेघा हिच्या गळ्यावर वार करून हत्या केली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून सासरे बबन श्यामराव शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर संशयित आरोपी गजानन शिंदे यांनी आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. त्याला वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.