– १ ते ५ एप्रिलदरम्यान गावात स्थानिक चौकशी व सर्वेक्षणाची मोहिम
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०४ : महाराष्ट्र शासनाच्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत धानोरा तालुक्यातील रांगी गावात महसूल विभागामार्फत ४ एप्रिल २०२५ रोजी चावडी वाचन आयोजित करण्यात आले. ग्रामपंचायत भवनात सरपंच फालेश्वरी प्रदीप गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वाचनात गंभीर बाब समोर आली. गावातील सातबारा उताऱ्यांवर अद्याप ३२० मृत व्यक्तींची नावे नोंद असल्याचे उघड झाले.
तलाठी साजा क्रमांक १४ अंतर्गत रांगीसह निमगाव, बोरी, मासरगट्टा आणि निमनवाडा या पाच गावांचा समावेश आहे. त्यापैकी रांगी – १०३, निमगाव – ६८, बोरी – ४५, मासरगट्टा – ७२ आणि निमनवाडा – ३२ अशा एकूण ३२० मृत व्यक्तींची नावे सातबाऱ्यावर नोंद असल्याचे आढळले.
१ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत रांगी तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून गावात सर्वेक्षण व स्थानिक चौकशी करण्यात आली. या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे सातबाऱ्यावरून मृत व्यक्तींची नावे हटवून त्यांच्या वारसांची नोंद करणे. चावडी वाचनाच्या माध्यमातून ही प्रक्रिया गावकऱ्यांना समजावून सांगण्यात आली.
६ एप्रिल ते २० एप्रिल या दरम्यान संबंधित वारसांनी मृत्यू प्रमाणपत्र, वारसा प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र, पोलीस पाटील व सरपंचांचे प्रमाणपत्र, भ्रमध्वनी क्रमांक, रहिवासी पुरावा व अर्ज तलाठी कार्यालयात सादर करावयाचे आहेत. नंतर ई-फेरफार प्रणालीच्या माध्यमातून ही नावे सातबाऱ्यावरून कमी करून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे. मंडळ अधिकारी या प्रक्रियेचे अंतिम निरीक्षण करून सातबारा दुरुस्त करतील.
यामुळे वारस नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, वर्षानुवर्षे रखडलेल्या जमिनीच्या मालकी हक्काबाबत निर्णय त्वरित घेणे शक्य होणार आहे. कोर्टाच्या झंझटीपासून शेतकऱ्यांची मुक्तता होऊन वेळ व पैशाची बचत होणार आहे.
या चावडी वाचन प्रसंगी सरपंच फालेश्वरी प्रदीप गेडाम, दिवाकर भोयर, देवराव कुनघाडकर, नरेंद्र भुरसे, यशपाल टेंभुर्णे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महसूल विभागाला सहकार्य करून ही मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन तलाठी एस. के. हजारे यांनी यावेळी केले.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #LiveSatbara
#RangiVillage #DhanoraTaluka #RevenueDepartment #ChavdiReading #LandRecords #DeceasedNames #HeirRegistration #EMutation #FarmerRights #LandOwnership #TransparentGovernance #MaharashtraRevenue
#जिवंतसातबारा #रांगीगाव #धानोरातालुका #महसूलविभाग #चावडीवाचन #सातबारा #वारसनोंदणी #मृतनोंदी #ईफेरफार #ग्रामविकास #शेतकरीहक्क #मालकीहक्क #महाराष्ट्रमहसूल