The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५: सिकलसेल आजाराचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. त्याबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी लोक चळवळ सुरू व्हावी, अशी अपेक्षा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे यांनी किसान भवन धानोरा येथे आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय सिकलसेल आजार नियंत्रण व जनजागृती कार्यक्रमात व्यक्त केली.
सदर शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार लोखंडे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून सिताराम बडोदे, गोडलवाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुणाल मोडक, डॉ. डोंगे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक अरविंद कोडाप, एक्स-रे तंत्रज्ञ हंगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. दहिफळे म्हणाले, “शक्यतो रक्ताच्या नात्यांमध्ये लग्न करणे टाळा, जेणेकरून सिकलसेल आजाराचे संक्रमण काही प्रमाणात थांबवू शकू.” उद्घाटनावेळी लोखंडे यांनी जनतेला आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सदर शिबिरामध्ये ७०० लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. धानोरा तालुक्यात २२०० सिकलसेल रुग्ण असून, त्यापैकी ३०० रुग्ण डबल एस पॅटर्नचे असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. कार्यक्रमात डॉ. मोडक, डॉ. ढोंगे, आणि सीताराम बडोदे यांनी मार्गदर्शन केले. क्षयरोग, कुष्ठरोग व अन्य पथकांनी रक्त तपासण्या केल्या.
कार्यक्रमाचे संचालन गिरीश लेनगुरे यांनी केले, प्रास्ताविक अरविंद कोडाप यांनी सांगितले, तर आभार व्यक्त अनिल शंकावार यांनी मानले.
