The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : जिल्ह्यातील माँ दंतेश्वरी रुग्णालय येथे स्पाईन फाउंडेशन मुंबई आणि सर्च यांचे संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या मणक्यांच्या आजारांसाठी शस्रक्रिया शिबिरामध्ये भारतातील प्रसिद्ध स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज आणि त्यांचे सहकारी यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम ठिकाणी तीन दिवसात एकूण २२ रूग्णांच्या यशस्वी शस्रक्रिया केल्या.
सलग तीन दिवस अविरत सुरू असलेल्या या शिबिरात मुंबई व नागपूर येथून आलेले स्पाईन सर्जन डॉ.शेखर भोजराज, डॉ.प्रेमिक नागड, डॉ.समीर कोलकटवार, डॉ.शीतल मोहिते, डॉ. प्रसाद कापरे, डॉ. तेजस्वी अग्रवाल, डॉ.हर्षल बाम, डॉ. अपूर्व गौरेन, डॉ. प्रणव राजेंद्र, डॉ. नरेश चौधरी, भूलतज्ञ डॉ. समृद्ध राज , डॉ. प्रज्ञा गज्जेलवार, डॉ. मनीषा घोष, डॉ. प्रीती नंदा, डॉ. मानसी बापट, डॉ. कपिल खंडेलवाल, डॉ. शुभम पेटकर, डॉ. लीला कृष्णा, फिजिओथेरपिस्ट डॉ. गौरिष केंकरे, डॉ. उमेर काझी तसेच स्पाईन फाऊंडेशनच्या व सर्च रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वच्या सर्व शस्रक्रिया यशस्वी झाल्या असून रुग्णांना दिलासा मिळाला आहे. शस्रक्रिया झालेल्या रुग्णांना १० दिवस नियमित फिजिओथेरपी उपचार करून त्यांना आपले दैनंदिन कामे करण्यास सक्षम करण्यात येत आहे.
मणक्याच्या दुखण्याच्या त्रासाने पीडित व जीवन असह्य झालेले रुग्ण शस्रक्रियेच्या चमत्काराने जीवनात नवीन आशा घेवून जात आहेत. सर्च रुग्णालयात मान, पाठ, कंबरदुखी, संधिवात, अस्थिरोग या त्रासांसाठी अद्यावात फिजिओथेरपी विभाग कार्यरत असून याची ख्याती सर्वदूर पसरत आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील मणके आणि सांधेदुखी च्या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना मुंबई आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरात जाऊन ही सेवा घेणे शक्य होत नाही म्हणून अश्या आजारासाठी सर्व सोयींनी अद्ययावत अश्या माँ दंतेश्वरी रुग्णालय गडचिरोली या ठिकाणी अत्यल्प दरात मुंबई व नागपूर येथील नामांकित रुग्णालयातील तज्ञ सर्जन येवून समाजाप्रती असलेले ऋण व्यक्त करून सेवाभावी वृत्तीने सेवा देत आहेत. वर्ष भरात १०० शस्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असून पुढील शस्रक्रिया शिबिराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी लवकर नोंदणी करण्याचे आवाहन सर्चचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता भलावी आणि संचालिका डॉ. राणी बंग यांनी केले आहे.स्पाईन सर्जरी शिबीर यशस्वी केल्याबद्दल सर्च चे संचालक डॉ. अभय बंग यांनी सर्व टिमचे अभिनंदन केले.