गोंडवाना विद्यापीठातील पीएच.डी संशोधन प्रक्रियेतील अडचणी सोडवा

153

– गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनचा यशस्वी पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, १२ ऑगस्ट : गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रात सामाजिक शास्त्र, विज्ञान तंत्रज्ञान वाणिज्य व आंतरविद्या शाखेमध्ये संशोधनाच्या अनेक संधी असून ग्रामीण, आदिवासी होतकरू विद्यार्थी विविध विषयात संशोधन करीत आहेत मात्र पीएच.डी संशोधक प्रक्रियेत संशोधन विद्यार्थी, मार्गदर्शक, संशोधन केंद्र यांना अनेक अडचणी निर्माण होत असल्याने या अडचणी सोडवण्याच्या संदर्भात गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून या संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांचे सोबत नुकतीच बैठक घेऊन या समस्या सोडवण्याची मागणी केली आहे.
सदर बैठकीमध्ये संशोधन प्रक्रियेतील अनेक अडचणी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष व विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय गोरे आणि संघटनेचे सचिव व विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विवेक गोरलावार यांच्याद्वारे सादर करण्यात आल्या असून यामध्ये संशोधन केंद्राद्वारे आर.ए.सी .च्या माध्यमातून प्राप्त झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संशोधन आराखडे संशोधन व मान्यता समितीच्या अधिकृत मान्यतेसाठी समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन शिष्यवृत्ती करिता लाभ घेणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा त्वरित लाभ मिळण्यासाठी आर आर.सी. झालेल्या संशोधन विद्यार्थ्यांचे पीएच.डी. नोंदणी प्रमाणपत्र त्वरित देण्यात यावे. तसेच संशोधन केंद्रावरील पूर्णवेळ आणि अर्ध वेळ संशोधन विद्यार्थी हजेरी बाबत विद्यापीठाद्वारा स्पष्टता देण्यात यावी ,समूह संशोधन केंद्र निर्माण करून संशोधन मार्गदर्शकांना सामावून घेऊन त्यांचे संशोधन मार्गदर्शन निरंतर चालू ठेवावे.
पीएच.डी कोर्स वर्क अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा जलद गतीने घेण्यात यावी, तसेच आचार्य पदवी करता शोध प्रबंध विद्यापीठात सादर झाल्यानंतर त्याची पुढील प्रक्रिया कालबध्द पद्धतीने त्वरित पूर्ण करण्यात यावी,पीएच.डी. मौखिक चाचणी झाल्यानंतर सदर संशोधक विद्यार्थ्यांचे नोटिफिकेशन विनाविलंब त्वरित काढण्यात यावे , शारीरिक शिक्षण शास्त्र विषयाचे संशोधन केंद्र विद्यापीठ परीक्षेत्रामध्ये निर्माण करण्यास विद्यापीठाने पुढाकार घेऊन अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला शारीरिक शिक्षण संशोधन केंद्राचा प्रश्न मार्गी लावावा, आचार्य पदवीकरता मौखिक चाचणी घेण्याकरिता येणाऱ्या बाह्य परीक्षकांना कार अथवा टॅक्सीचा प्रवास भत्ता देय करण्यात यावा यासह संशोधन प्रक्रियेतील अनेक अडचणी बाबत संघटनेच्या वतीने प्रशासनाला अवगत करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन काही अडचणी त्वरित सोडण्याची निर्देश दिले व काही तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. श्रीराम कांवळे यांचे अध्यक्षतेखाली त्वरित समितीची नावे गठित करून सदर समितीने विनाविलंब अहवाल सादर करण्याचे निर्देश संघटनेच्या पदाधिकारी तसेच संशोधक मार्गदर्शक व संशोधन विद्यार्थी यांचे समोर दिले आहे. यामुळे संशोधक मार्गदर्शक व संशोधक विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आचार्य पदवी प्राप्त करण्यातील येणाऱ्या अडचणी लवकरच सुटणार अशा विश्वास निर्माण झाला आहे.
यावेळी संघटनेचे सहसचिव डॉ.प्रमोद बोधाने, विभाग समन्वयक डॉ. राजेंद्र गोरे प्रसिद्धीप्रमुख प्रा. रुपेश कोल्हे, डॉ. चव्हाण ,डॉ. विखार, डॉ. कैलास भांडारकर, डॉ.चावके, डॉ.निरंजने, डॉ.खुशाल लांजेवार, प्रतिश अंबाडे, डॉ. दुबे मॅडम, शंकर पुरडकर, सोनल कुर्झेकर, वर्षा गवळी, हर्षाली बांनकर, सुशील बानकर, सुनिता शिंगाडे, अमित कोपरे, स्वीटी लाड, सुचिता मोरे इत्यादी संशोधक विद्यार्थी तसेच गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील अनेक संशोधक मार्गदर्शक, संघटनेचे पदाधिकारी व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here