गोंडवाना विद्यापीठात स्पार्क पदवी वितरण सोहळा संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०५ : ‘स्पार्क’ ग्रामीण समाजात व्यसनांविरुद्धचा कार्यक्रम या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पदवी वितरण समारंभ ४ जानेवारी २०२४ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. सर्च संस्था व गोंडवाना विद्यापीठ घटक आदर्श पदवी महाविद्यालय यांचे समन्वयातून सुरू करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमाच्या मागील दोन तुकडीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदवी वितरित करण्यात आल्या.
या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून सर्च संस्थेचे संचालक डॉ. अभय बंग तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे उपस्थित होते. यासह मान्यवर डॉ. श्रीराम कावळे, डॉक्टर मनीष उत्तरवार, प्राचार्य डॉ. कृष्णा कारू, आणि सर्च द्वारा स्पार्कचे संयोजक श्री. तुषार खोरगडे, मुक्तिपथचे सहसंचालक संतोष सावळकर, समन्वयक भरत घेर व सर्च मधील वरिष्ठ कार्यकर्ते, मुक्तिपथचे सर्व तालुका संघटक, समुपदेशक, यावेळी उपस्थित होते.
समारंभात स्पार्क अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अभय बंग व डॉक्टर बोकारे सर यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. अभय बंग यांनी स्पार्कच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकताना सांगितले की, “काम करा, कमवा आणि शिका” हा या अभ्यासक्रमाचा मुख्य आधार आहे. स्पार्क प्रकल्पाने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ठिणगी पेटवली असून ही ठिणगी भविष्यात समाजासाठी प्रकाश निर्माण करेल, मुक्तिपथच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याच्या 12 तालुक्याच्या १५०० गावात होणारा हा शिक्षणाचा यशस्वी प्रयोग आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. बोकारे सरांनी अध्यक्षीय भाषणात बोलतांना हा अभ्यासक्रम वर्ग खोलीत होणारा नसून, प्रत्यक्ष गावात राहून शिक्षण देणारा अनोखा अभ्यासक्रम व विद्यापीठाला अभिमान वाटावा असा आहे, इतर विद्यापीठाने सुरू करावा असा आहे. “स्पार्क प्रकल्पातून विद्यार्थ्यांना नवीन दृष्टिकोन मिळाला आहे, आणि त्याचा प्रभाव त्यांच्या आयुष्यातील पुढील अनेक वर्षे दिसून येईल,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी स्पार्क अभ्यासक्रमाचे प्रत्यक्ष क्षेत्रकार्याच्या ठिकाणी शिक्षण देत असलेले मुक्तिपथचे तालुका संघटक व समुपदेशक, तसेच प्रशिक्षक म्हणून असलेले सर्चचे साधन व्यक्ती या सर्व मान्यवरांचा यावेळी कुलगुरू बोकारे सर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे विविध कर्मचारी, विद्यार्थी, प्राचार्य, सर्च संस्थेचे कार्यकर्ते, मुक्तिपथ जिल्हा चमू, स्पार्क चमू, पदवीधर विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. आदर्श पदवी महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर, मुकेश पराते, व इतर सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आदर्श महाविद्यालयाचे समन्वयक भरत घेर यांनी मान्यवरांचे आभार मानले.