The गडविश्व
गडचिरोली दि.१२ : भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे आज 12 फेब्रुवारी 2024 रोजी, नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तालुक्यातील सर्व विभागांचा समावेश करण्यात आला होता.
या शिबिरात ॲग्रिस्टॅक (Agristack), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan), संजय गांधी निराधार योजना, आधार नोंदणी व दुरुस्ती, आयुष्मान भारत कार्ड तयार करणे, प्रलंबित फेरफार घेणे, तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभ उपलब्ध करून देणे यासारख्या महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली.
आदिवासी प्रकल्प कार्यालय, भामरागड मार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे अर्ज लाभार्थ्यांकडून स्वीकारण्यात आले. तसेच नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी तत्परतेने कार्य केले. या उपक्रमामुळे तालुक्यातील लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला असून, अशा उपक्रमांमुळे गरजू नागरिकांना मदत मिळून प्रशासन व जनता यामधील समन्वय अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी नमन गोयल यांनी व्यक्त केली.
