आरमोरी ते रांगी पर्यंतचा वीजपुरवठा नियमित सुरू करा

121

– रांगी येथे येणाऱ्या विद्युततारा कापुन वानरचुवा येथेच खंडित, नाममात्र लोखंडी खांब उभे
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २७ मार्च : आरमोरी येथून रांगी येथे येणारा वीज पुरवठा वानरचुवा गावातच मागील चार वर्षापूर्वी तारा कापुन खंडित करण्यात आला असल्याने येथील नागरिकांच्या मनात रोष निर्माण झालेला असून सदर पुरवठा रांगीपर्यंत नियमित करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
धानोरा तालुक्यातील रांगी हे शिक्षणाचे, व्यापाराचे केंद्रबिंदू असून दर बुधवारी आठवडी बाजार भरतो. ये-जा करणाऱ्या लोकांची व वाहनांची मोठी वर्दळ असते. गावाच्या विकासात विद्युत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. रांगी या गावासाठी धानोऱ्यावरून विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. परंतु रांगी ते धानोरा या मार्गावर मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने हिवाळा, पावसाळा व उन्हाळा या ऋतूमध्ये येणाऱ्या वादळ वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. वीज पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन रांगी गावासह परिसराला विद्युततारा जोडण्याकरिता शासकीय आश्रम शाळेसमोर डीपी बसवण्यात आली. मात्र त्या डिपीला तारा जोडल्या गेल्या नाहीत कारण आरमोरी वरून येणाऱ्या विद्युत तारा वानरचुवा गावातच कापण्यात आल्या व त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सुकलेल्या झाडाला बांधण्यात आल्या आहेत. ज्या कंत्राटदाराला हे कंत्राट दिले होते त्याने विद्युत खांब उभे करून त्याची वायरिंग जोडणे आवश्यक होते. मात्र ठेकेदाराने खांबाचे वायर कापून झाडाला बांधून ठेवले. उभे असलेले विद्युत काम जागोजागी पडलेले व वाकलेल्या स्थितीत आहेत, खांबावर कोणत्याच प्रकारच्या विद्युत तारा दिसत नाही तर ज्या तारा होत्या त्या चोरीला गेल्याचे समजते. त्यामुळे सदर काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे.
गावच्या विकासाकरता वीज आवश्यक आहे वीज नसल्यास अनेक कामे पडून असतात मात्र संबंधित विभाग कुंभकर्णच्या झोपेत असल्याचे दिसून येत आहे. रांगी हे परिसराचे केंद्रबिंदू असल्याने येथे ऑनलाइन कामे केल्या जातात परंतु विज वेळोवेळी साथ देत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रांगी येथे जिओ कंपनीचे फोरजी, आयडियाचे फोरजी तर बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क आहे. मात्र विद्युत पुरवठा नेहमीच खंडित होत असल्याने परिसरातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशातच आरमोरी वरून येणारे वीज गावाकरिता तसेच परिसरा करीता लाभदायक ठरू शकते. रांगी गावापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

(The gdv) (armori rangi dhanora) (the gadvishva)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here