– गडचिरोली प्रशासन सज्ज
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : शुभमुहूर्त समजल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेला होणाऱ्या बालविवाहाच्या घटनांना आळा घालण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार, यंदा बालविवाह करणाऱ्यांवर आणि त्यास सहकार्य करणाऱ्यांवर थेट कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी दिला आहे.
बालविवाह रोखण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामविकास अधिकारी, तर शहरी भागात बालविवाह प्रतिबंध अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, विवाहात सहभागी असलेले धार्मिक गुरू, पंडित, मंडप व लॉन मालक, छायाचित्रकार, केटरिंग व्यावसायिक, वाजंत्री – हे देखील कायद्यातून सुटणार नाहीत. कोणताही बालविवाह झाला तर त्यास कारणीभूत असलेल्यांवर बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत कठोर शिक्षा होणार आहे.
अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि या दिवशी मोठ्या प्रमाणावर विवाह होत असतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी बालविवाहाची कुठलीही माहिती मिळाल्यास 1098 किंवा 112 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याची गोपनीयता राखली जाणार आहे.
गेल्या सहा वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात 17 बालविवाह थांबविण्यात आले असून, राज्यभरात हे आकडे 5,421 पर्यंत गेले आहेत. त्यापैकी 401 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत, ही गंभीर बाब लक्षात घेता प्रशासन यंदा कोणतीही तडजोड न करण्याच्या भूमिकेत आहे.
बालविवाह हा फक्त गैरकायदेशीरच नाही, तर बालकांच्या भविष्यावर अंधार टाकणारा गुन्हा आहे. समाजाने एकत्र येऊन या अनिष्ट प्रथेला पूर्णविराम द्यावा, हीच काळाची गरज आहे.
