सिटू संघटनेचे यशस्वी विभागीय अधिवेशन; आश्रम शाळा कर्मचाऱ्यांच्या लढ्यास नवी दिशा
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. २१ : नागपूरच्या झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू) संघटनेचे नागपूर विभागीय अधिवेशन उत्साहात पार पडले. शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमधील कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि शासनाच्या जाचक अटींविरोधात एकत्रित लढ्याची दिशा ठरवण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
सिटूचे नागपूर विभागीय अध्यक्ष खवशी यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. जवळपास ५०० हून अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून संघटनेच्या ताकदीचे दर्शन घडवले. विविध विषयांवर झालेल्या चर्चासत्रांतून कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा, जाणीव आणि प्रेरणा मिळाली.
या अधिवेशनात माजी अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, आमदार सुधाकर अडबाले, जुन्या पेन्शन हक्क चळवळीचे वितेश खांडेकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये नवचेतना निर्माण झाली.
शासकीय व अनुदानित आश्रम शाळांतील कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत सातत्याने संघर्ष करणाऱ्या सिटू संघटनेच्या कार्याची दखल घेत विकास जनबंधू (वडेगाव, ता. कुरखेडा) यांचा मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी “लाल सलाम” देत संघटनेच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. या यशस्वी अधिवेशनासाठी खवशी, सौ. लांजेवार आणि नागपूर विभागातील पदाधिकाऱ्यांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले.
आपल्या मनोगतात विकास जनबंधू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शासनाच्या अन्यायकारक धोरणांना रोखण्यासाठी आणि आश्रम शाळांमधील कर्मचाऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी संघटित लढा हाच एकमेव मार्ग आहे.” त्यांनी अतिदुर्गम भागांतून आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.
या अधिवेशनाने नागपूर विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना सार्वजनिक व्यासपीठ मिळवून दिले. उपस्थितांनी “जय सेवा, लाल सलाम!”च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. संघटनेने येत्या काळात लढ्याला अधिक धार देण्याचे संकेत दिले असून, हे अधिवेशन कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीचा मैलाचा दगड ठरले आहे.
