– मेळावास्थळी अनोखा डोम आणि व्यासपीठ
– बाहेरून येणाऱ्या उमेदवारासाठी विशेष बसगाड्यांची व्यवस्था
The गडविश्व
नागपूर, दि. ०७ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे ९ आणि १० डिसेंबर रोजी नागपूर येथे “नमो महारोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथील जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, अमरावती रोड येथे जय्यत तयारी करण्यात आली असून, भव्य असा अनोखा डोम आणि व्यासपीठ उभारण्यात आला आहे. यात ५ हजार उमेदवार बसू शकतील इतकी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपूरसह विदर्भातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नागपुरात दोन दिवसीय “नमो महारोजगार मेळावा” होत आहे. उद्धघाटन सोहळ्यासाठी भव्य मंच, माहिती व सुविधा केंद्र, ऑनस्पॉट नोंदणीसाठी कक्ष, मुलाखतीसाठी स्वतंत्र कक्ष व्यवस्था, देशभरातून आलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसाठी कक्ष, माध्यम प्रतिनिधींची मीडिया कक्ष अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डोम क्रमांक दोनमध्ये मुलाखत कक्ष, डोम क्रमांक तीनमध्ये कौशल्य विकास विभागाचे दालन, बजाज हॉल येथे मुलाखत कक्ष राहणार आहेत. या शिवाय उदघाटन सोहळा झाल्यानंतर मुख्य डोममध्ये देखील मुलाखती आणि कार्यशाळा, मार्गदर्शन सत्र होतील.
मेळावास्थळी एकूण ५० नोंदणी स्टॉल राहणार असून, २५ नवीन नोंदणी आणि २५ ऑनलाईन नोंदणीच्या उमेदवारासाठी असतील. नोंदणीकृत उमेदवारासाठी नाश्ता आणि जेवण कुपन देण्यात येईल. संपूर्ण परिसरात सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या उमेदवारासाठी गणेशपेठ, मोरभवन, इतवारी, अजनी, बर्डी मेट्रो स्टेशन येथे विशेष बस गाड्याची व्यवस्था राहणार आहे. या मेळाव्यात स्थानिक, राज्यस्तरीय आणि देशभरातील मल्टीनॅशनल कंपन्यांनी एकूण २६ हजारपेक्षा अधिक नोकरीची रिक्वायरमेंट नोंदविली आहे. मुलाखतीअंती सुमारे १० हजार तरुणांना जॉब ऑफर लेटर देण्यात येईल. आतापर्यंत ५० हजाराच्या आसपास उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.