– आरोग्यावर विपरीत परिणाम
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २५ : तालुक्यातील रांगी येथे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. पाण्याच्या टाकीत पुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने दहा दिवसापासून गावातील लोकांना पिण्याचे पाणी मिळाले नाही. तर त्यानंतर सोडलेले पाणी खराब, गढूळ आणि गाळ युक्त असुन पिण्यायोग्य तर नाहीच पण आंघोळ सुद्धा करु शकत नाही. असा पाण्याचा पुरवठा होत असल्याने गावातील नागरिकांना दूषित आणि गाळयुक्त पाणी प्यावे लागत असल्याने याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असून रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे.
धानोरा तालुक्यातील रांगी येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळण्यासाठी नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. ह्याच नळ योजनेत वांरवार बिघाड होत असल्याने गावकऱ्यांना दुषित पाणी प्यावे लागत आहे.
नळयोजनेत टाकलेल्या पाईप लाईन मधे वारंवार बिघाड निर्माण होत आहे.
आता पावसाळा सुरू झाल्याने नाल्याला वाहून येणारे पाणी गढूळ आणि गाळ युक्त आहे. दुषित पाणी नळाला येत असल्याने येथिल ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात महिला शेतीकामात व्यस्त असताना पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत बसावे लागते. त्यातच दुषित पाणी प्यावे लागत असल्याने याचाही परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्याची प्रतिक्रिया गावकरी देत आहेत. महिला मात्र पिण्याचे पाण्यासाठी हातपंप, विहीर घरगुती बोअर चा पाणी वापरताना दिसतात. तर काही लोक तुरटी फिरवून वापरताना दिसतात. नळाद्वारे येणारे पाणी कोणत्या कामी लागत नाही. असेच पाणी जनावरांनी पिलेतर त्यामुळे जनावरांना रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथील नळाच्या टाकीवर पाणी स्वच्छ करण्यासाठी आवश्यक असलेले फिल्टर बसविले नाही आहे. त्यामुळे नळयोजना बनली तेव्हा पासून रांगी येथील गावकऱ्यांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. पण याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसून येते.
रांगी प्राथमिक आरोग्य केंद्राने स्थानिक सरपंच सचिवांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, येथील नळाद्वारे गढूळ आणि गाळयुक्त पाणी लोकांना पिण्यासाठी येत असल्याने लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे जलजन्य आजार अतिसार, कावीळ, गॅस्ट्रो, विषमज्वर इत्यादी जलजन्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपल्या स्तरावरून योग्य ते उपाययोजना करून वेळीच जनतेला शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा पुढील उद्भवणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे १९ जुलै २०२४ ला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolipolice #dhanora)