-मुक्तिपथ तालुका समितीच्या बैठकीत गांगुर्डे यांचे निर्देश
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : एटापल्ली तालुक्यातील सर्व कार्यालय तंबाखूमुक्त करावे. तंबाखूचे दुष्परिणामाचे जनजागृती करणारे बॅनर प्रत्येक शाळेत लावून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त करावे तसेच अवैध दारू व तंबाखूचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने कार्यवाही करावी, असे आदेश तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी दिले.
एटापल्ली तहसील कार्यालयात मुक्तिपथ तालुका समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत तालुका स्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस निरीक्षक एन.जी. कुकडे, गटशिक्षण अधिकारी ऋषिकेश बुरडकर, एनएसएस कार्यक्रम अधिकारी चिन्ना पुंगाटी, एनसीडी समन्वयक सुधाकर श्रीरामे, मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार, रवींद्र वैरागडे, उत्कर्ष राऊत, लता बकतू प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत विभागनिहाय आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रा. चिन्ना पुंगाटी यांनी आपले महाविद्यालय दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतील. व समाजउपयोगी उपक्रम घेताना दारू व तंबाखूचे दुष्परिमाण समजावून सांगण्यात येतात. असे सांगितले. गटशिक्षणाधिकारी अधिकारी ऋषिकेश बुरडकर यांनी तालुक्यातील सर्व शाळा, कार्यालय तंबाखूमुक्त करू अशी माहिती दिली. ग्रामीण रुग्णालयाचे श्रीरामे यांनी रुग्णालय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यात येत असल्याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक कुकडे यांनी शहरात व परिसरातील गावात अवैध दारू व सुगंधित तंबाखूवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली. मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मलेवार यांनी गावात गाव संघटनेच्या माध्यमातून दारूवर अहिंसक कृती, शाळेत जनजागृती, दारूमुक्त पोळा, दारू व तंबाखूमुक्त गणेश मंडळ, राखी विथ खाकी कार्यक्रम, महिला ग्रामसभा व महिला शक्तीपथ कार्यक्रम, स्त्री आरोग्य शिक्षण, गावात व शहरात व्यसन उपचार क्लिनिक अशा प्रकारच्या कामाचा व जनजागृतीचा आढावा सादर केला.
(#thegadvishva #gadchirolinewa #gadchirolipolice #muktipath )