पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

20

– नागरिकांसाठी मोफत सौरऊर्जेची संधी; अनुदानासह कर्ज सुविधाही उपलब्ध
The गडविश्व
गडचिरोली दि. १७ : केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर मोफत वीज योजना’ अंतर्गत घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सौर विद्युत प्रकल्प एकदा बसवल्यानंतर त्यातून 25 ते 30 वर्षापर्यंत सौर विद्युत निर्मिती करता येते. एक किलोवॅट प्रकल्पासाठी स्थानिक उपलब्धतेनुसार सुमारे 60 ते 70 हजार रुपये पर्यंत खर्च येतो, त्यात 30 हजार रुपये अनुदान शासनाकडून मिळणार आहे. याशिवाय, सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी अनेक बँकांतर्फे कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे, त्यामुळे आर्थिक अडचण असलेल्या नागरिकांसाठीही ही योजना सहजसोप्या पद्धतीने राबवता येणार आहे. नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन वीज बचत आणि उत्पन्न वाढ यासाठी पुढाकार घ्यावा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

योजनेची वैशिष्ट्ये आणि अनुदानाची रचना

1 किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्पासाठी – ₹30,000 अनुदान

2 किलोवॅटसाठी – ₹60,000 अनुदान

3 किलोवॅटसाठी – ₹78,000 अनुदान

जिल्हाधिकारी यांनी पीएम सूर्यघर योजना तसेच कुसुम-बी सौर कृषी पंप योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर आणि कार्यकारी अभियंता सचिन कोहाड उपस्थित होते. त्यांनीही सौरऊर्जा प्रकल्पांच्या तांत्रिक बाबी आणि नागरिकांसाठीच्या सुविधांबाबत माहिती दिली.

अर्ज प्रक्रिया :

1. ऑनलाइन नोंदणी: अधिकृत पोर्टलवर (https://pmsuryaghar.gov.in/) अर्ज भरावा.

2. दस्तऐवज अपलोड: मालमत्तेचा पुरावा, वीजबिल आणि ओळखपत्र आवश्यक.

3. पडताळणी व अनुदान मंजुरी: पात्र अर्जदारांना अनुदान मंजूर होईल.

4. सौर पॅनेल बसवणे: अधिकृत एजन्सीद्वारे सौरऊर्जा प्रणाली बसवली जाईल.

अधिक माहिती आणि मदतीसाठी नागरिकांनी स्थानीय वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here