– सकाळच्या सत्रात आला सर्वर मध्ये तांत्रिक बिघाड
The गडविश्व
गडविश्व, २१ ऑगस्ट : राज्यातील तलाठी भरती करिता १७ ऑगस्ट पासून तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा सुरू झाली. मात्र आज २१ ऑगस्ट रोजी वेळापत्रकानुसार सकाळच्या पहिल्या सत्रात ९.०० ते ११.०० या नियोजीत वेळेत टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सदरचे सत्र वेळेनुसार सुरु करण्यास अडचण निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परिक्षा उशीरा सुरु होणेबाबत कळविण्यात आले असुन आज होणारे पेपर नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरू होणार आहे.
तलाठी भरतीकरीता राज्यातील ३० जिल्हे व ११५ टीसीएस केंद्रावरती परीक्षा नियोजीत करण्यात आली होती. सदर परिक्षेच्या वेळापत्रकानुसार सकाळी आज २१ ऑगस्ट रोजी पहिले सत्र ९.०० ते ११.०० नियोजीत करण्यात आले होते. मात्र टीसीएस कंपनीच्या डेटा सेंटर सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झालेने सदरचे सत्र वेळेनुसार सुरु करणेस अडचण निर्माण झाली. यासंदर्भात टीसीएस कंपनीकडून राज्य समन्वय कार्यालयास परिक्षा उशीरा सुरु होणेबाबत कळविण्यात आले. टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांनी सर्व देशभरातील परिक्षासंदर्भातील हा तांत्रिक बिघाड झाला असल्याने वरिष्ठ वैज्ञानिक यांच्या स्तरावर याबाबत युध्द पातळीवर हा तांत्रिक बिघाड शोधून परिक्षा ११.०० वाजता सर्व केंद्रवार सुरु करणेबाबत कळविण्यात आले. राज्य समन्वयक यांनी सर्व निवासी उप जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क करुन प्रथम सत्रातील विद्यार्थ्याना नियोजीत परिक्षा उशीरा सुरु होईल असे कळविण्यात आले. त्याप्रमाणे सर्व परिक्षाकेंद्रांवरील परिक्षार्थीना याची सुचना देण्यात आली. टीसीएस कंपनीकडून तांत्रिक बिघाड दूर करण्यात येवून राज्यातील सर्व ११५ केंद्रावर परिक्षा सुरु करणेबाबत सुचना मिळाल्यानंतर सर्व परिक्षा केंद्रातील अधिकाऱ्यांना याबाबत सुचित करण्यात येवून परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला असून राज्यातील सर्व ११५ केंद्रावर ११.०० वाजता परिक्षा सुरु करणेत आली आहे. राज्यातील सर्व तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना टीसीएस कंपनीच्या तांत्रिक बिघाडामुळे आज होणाऱ्या तीनही सत्रातील परिक्षा नियोजीत वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरु होतील. त्याप्रमाणे बदलेल्या वेळेबाबत सर्व परिक्षा केंद्रावर सुचना प्रसारित करणेची कार्यवाही निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत परिक्षा केंद्राना देण्यात येत आहे. तरी सर्व परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी महसूल प्रशासन / पोलीस प्रशासन तसेच टीसीएस कर्मचारी यांना सहकार्य करावे, सर्व परिक्षार्थीना नियोजीत दोन तासांचा वेळ परिक्षेसाठी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग परिक्षार्थी यांना आजचे सत्र दोन मध्ये अतिरिक्त देय असणारा वेळ देण्यात येणार आहे. आज टीसीएस कंपनी व त्यांचे डेटा सेंटर यांचे कडून तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या दिरंगाई व मनस्तापाबद्दल शासनाच्या वतीने राज्य समन्वयक तलाठी भरती परिक्षा २०२३. यानिवेदनाद्वारे दिलगीरी व्यक्त करीत आहे.सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन आनंद रायते भा.प्र.से. राज्य परिक्षा समन्वयक तलाठी भरती परिक्षा २०२३ जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांनी केले आहे.
(the gdv, the gadvishva, talathi exam 2023, gadchiroli, mh, maharashtra talathi exam)