– ई-ऑफिस प्रणाली मार्फत 12846 फाईल्स निकाली
The गडविश्व
चंद्रपूर, २४ जून : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि पेपरलेस होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यालय आता संपूर्णपणे ऑनलाईन’ झाले आहे. ई-ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून आतापर्यंत 12846 फाईल्स निकाली काढण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.
शासकीय कामकाज करतांना विविध विभागाच्या फाईल्स अनेक दिवस प्रलंबित असतात. वेळेवर फाईल्सचा निपटारा होत नसल्याने अनेक विकास कामांना विलंब होतो. तसेच प्रशासनावर नागरिकांचाही रोष वाढतो. यावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांनी 1 एप्रिल 2023 पासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावर अंमलबजावणी करीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 25 शासकीय कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व 8 उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणाली राबविण्यात येत आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील 15 तहसील कार्यालयांमध्ये ही प्रणाली सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.
सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल. शिवाय कामकाज संपूर्णपणे कागद विरहित (पेपरलेस) होणार असल्याने प्रशासनाच्या कामकाजात अधिक सुलभता येणार आहे. विशेष म्हणजे या प्रणालीच्या माध्यमातून मोबाईलवर देखील कामकाजाच्या फाईल्स, कागदपत्रे पाहता येणार आहे. ई-सेवा निर्देशांकात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आणण्यासाठी जास्तीत-जास्त सेवांची संख्या वाढविण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.
(The gadvishva, the gdv, chandrapur news)