– ‘मिशन अयोध्या’मध्ये आगीच्या भक्षस्थानी कलाकाराने चित्रित केला थरारक सिन
The गडविश्व
मुंबई, दि. २३ : निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटातील साहसदृश्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. हे साहस दृश्य जीवावर उदार होऊन चित्रपटात ‘कारसेवक विचारे’ ही प्रमुख भूमिका करणारे कलावंत डॉ. अभय कामत यांच्यावर चित्रित झाले आहे. चित्रपटातील एका दृश्यात प्रभू श्रीरामांचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न चित्रपटातील खलनायक करीत असतो. त्याच्या हातातून हा झेंडा खेचून कारसेवक विचारेंना तो वाचवायचा आहे. या झटापटीत चिडलेला खलनायक त्यांना पेटवून देतो. हे थरारक दृश्य कोणताही डमी कलाकार न घेता चित्रित करायचे होते. दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि प्रख्यात फाईट मास्तर मोझेस फर्नांडिस यांनी डॉ. अभय कामत यांना यातील धोका आणि खबरदारी याबद्दल कल्पना देत दृश्य समजावले. डॉ. अभय कामत यांनीही जीवावर बेतणारे हे दृश्य डमी न घेता चित्रित करण्याचे चॅलेंजिंग स्वीकारले. जराही जीवाची पर्वा न करता या व्यक्तिरेखेच्या ‘करो या मरो’ स्वभावानुसार त्यांनी हे दृश्य एका टेकमध्ये ओके केले. ते पाहून ऍक्शन डिरेक्टर मोझेस फर्नांडिस खूपच भावुक झाले. त्यांनी डॉक्टरांचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले आजपर्यंत त्यांनी हजारे चित्रपट त्यातील ऍक्शन सिन शूट केले आहेत पण डमी न घेता असा सिन यापूर्वी कोणत्याही कलावंताने केला नाही. ही रिस्क फक्त डॉ. अभय कामत सारखे तडफदार मराठी कलावंतच घेऊ शकतात, अशी भावुक प्रतिक्रिया त्यांनी दिली.