-गोंडवाना विद्यापीठाचा स्तुत्य उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑक्टोबर : मागासवर्गीयांना अत्यंत उपयोगी ठरावी अशी गोंडवाना विद्यापीठाने तयार केलेली मार्गदर्शिका २०२३- २४ अनुप्रवर्तक सोहळ्यात लोकार्पित आणि वितरित होणार आहे. हा सोहळा सोमवार १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता चंद्रपूर येथील दीक्षाभूमी येथे आयोजित केला आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले, तर मुख्य अतिथी म्हणून राज्याचे वने व सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे तसेच प्र- कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे प्रभृती उपस्थित राहणार आहेत.
या मार्गदर्शिकेत मागासवर्गीयांसाठीच्या सर्व शासकीय योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध शिष्यवृत्ती व फेलोशिप, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी सुवर्णपदके पारितोषिक, महाराष्ट्र ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची उद्दिष्टे व कार्ये,गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यृत्ती मंजूर करण्याबाबत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, सर्व शासकीय मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी असलेल्या आरक्षणात सुधारणा करण्याबाबत, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याबाबत इत्यंभूत माहिती असणार आहे.
या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे.