गडचिरोली जिल्ह्यातील १११ ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

857

– सदस्य पदासह थेट सरपंच पदाची होणार निवड
The गडविश्व
गडचिरोली, ०५ ऑक्टोबर : जिल्ह्यातील सार्वत्रिक / पोट निवडणूक असलेल्या एकूण १११ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्य ३ ऑक्टोबर २०२३ च्या आदेशान्वये माहे जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकासाठी संगणकप्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारीक पद्धतीने प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा शुक्रवार ६ ऑक्टोबर २०२३, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी सोमवार १६ ऑक्टोबर ते शुक्रवार २० ऑक्टोबर २०२३ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी सोमवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ बुधवार २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ बुधवार २५ ऑक्टोबर दुपारी ३ वाजतानंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा रविवार ५ नोव्हेंबर २०२३ गडचिरोली जिल्हयासांठी स.७.३० वा.पासून ते सायंकाळी ५.३० वा.पर्यंत आणि मतमोजणीचा मंगळवार ७ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल.
सदर निवडणूक कार्यक्रम शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मतदारांनी/नागरिकांनी सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्याकडून आवाहन करण्यात येत असल्याचे निवडणूक विभाग, गडचिरोली यांनी कळविले आहे.

अशी आहे निवडणूक होणाऱ्या (सार्वत्रिक / पोट) ग्रामपंचायतींची संख्या :
कोरची – १७ ग्रामपंचायती, कुरखेडा- ४, देसाईगंज -१, आरमोरी -१, गडचिरोली -६, धानोरा -२६, चामोर्शी-७, मुलचेरा-४, अहेरी – ६, एटापल्ली-१३, भामरागड -१४ आणि सिरोंचा तालुक्यातील १२ अशा एकूण १११ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक / पोट निवडणूक होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here