– परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासारखी अनुचित घटना न घडल्याचे कारण
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १३ जुलै : धानोरा तालुक्यातील रांगी येथे पोलीस मदत केंद्र सुरु करण्याची नागरिकांनी वारंवार मागणी केली. मात्र या मागणीला शासनाने हरताळ फासून रांगी येथील पोलीस मदत केंद्राचा प्रस्ताव आता फेटाळला आहे.
धानोरा तालुक्यातील रांगी येथे पोलीस मदत केंद्र सुरू करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी अनेकदा मागणी केली. त्यानंतर येथील महिला मंडळाने पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे पोलीस मदत केंद्र सुरु करण्याबाबतचे निवेदन देऊन केंद्र सुरू करण्याची मागणी केली असताना पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली यांनी मागील पाच वर्षाचा चौकशी अहवाल धानोरा पोलीस स्टेशन येथुन मागितला. त्यात २०१८ मध्ये दारूबंदी कायदा अंतर्गत ७ गुन्हे तर भाग पाच अन्वये ६ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. सन २०१९ मधे महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत ८ गुन्ह्यांची तर भाग पाच अन्वये ५ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. २०२० मधे दारूबंदी कायद्या अंतर्गत २ आणि भाग पाच अन्वये २ गुन्ह्यांचीच नोंद झालेली आहे. २०२१ महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत ३ गुन्ह्यांची तर भाग पाच अन्वये २ गुन्हाची नोंद झालेली आहे. सन २०२२ मधे महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत एकही गुन्ह्यांची नोंद नसून भाग पाच अन्वये ३ गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच चोरीच्या गुन्ह्याची एकही नोंद नाही. तसेच धानोरा तालुका मुख्यालयापासुन रांगी गावाचे अंतर १८ किमी असल्याने कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस स्टेशन धानोरा येथील अधिकारी कर्मचारी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यास सक्षम आहेत. रांगी गावांसह परीसरातील निमनवाडा, महावाडा, कन्हाळगाव, चिंगली, मोहली, मासरगाटा तसेच इतर गावांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कोणतीही अनुचित घटना परिसरात घडलेली नाही. त्यामुळे रांगी येथे पोलीस मदत केंद्र उभारण्याची गरज नसल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाने कळविल्याने परिसरातील जनता हिरमुसली आहे.