कोरची तालुक्यातील मार्ग अजूनही कच्चे

130

– कागदोपत्री रस्त्यांची कामे दाखवून निधी लाटल्याचा नागरिकांचा आरोप
The गडविश्व
ता प्र / कोरची- कुरखेडा (चेतन गहाने), १५ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोरची तालुक्यात पक्क्या रस्त्यांचा अभाव आहे. या भागात पक्के रस्ते न बांधताही रस्ते कागदोपत्री दाखवून निधी लाटला जात आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. कोरची तालुका अतिदुर्गम व संवेदनशील आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत कर्मचारी तर काही गावांमध्ये ग्रामसेवक हे कार्यालयातच हजर राहत नाहीत. वर्षानुवर्षे नागरिक स्वतः श्रमदान करून रस्ता बनवतात तर कंत्राटदार मात्र अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिले लाटतात, अशी स्थिती आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांत ह्या गावांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचे काम अद्यापही झाले नाही. त्यामुळे रस्ते निर्मिती घोळाची तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी कोरची तालुका आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून कारवाई करण्यासाठी कोरची तहसीलदारांमार्फत गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना निवेदन पाठवले होते. परंतु संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही.

ह्या रस्त्यांची झाली दुरवस्था

डाबरी ते पडियालजोब मार्गाचे खडीकरण, पडियालजोब ते आंबेखारी, आंबेखारी फाटा ते आंबेखारी खडीकरण, मुरकुटी ते मयालघाट खडीकरण, नवेझरी ते लेकुरबोडी फाटा खडीकरण, लेकुरबोडी फाटा ते चरवीदंड-काटेंगेटोला खडीकरण, काटेंगेटोला ते लक्ष्मीपूर खडीकरण अशा दहापेक्षा अधिक गावातील रस्ते कामाची स्थिती दयनीय आहे.

(the gdv, the gadvishva, korchi kurkheda, chetan gahane)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here