डार्लीतील महिलांनी गावाला केले दारूविक्रीमुक्त

160

-मुक्तिपथच्या सहकार्याने यशस्वी प्रयत्न
The गडविश्व
गडचिरोली, दि.१४ : आरमोरी तालुक्यातील डार्लीतील महिलांनी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करीत आपल्या गावाला अवैध दारूविक्रीच्या समस्येतून मुक्त केले. आता वर्षभरापासून गावात शांतता व सुव्यवस्था कायम असून ही दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी संघटन सक्रिय आहे.
डार्ली येथे अवैध दारूविक्रीमुळे अनेकजण त्रस्त झाले होते. अशातच मुक्तिपथ तर्फे गावात सघन भेटीचे आयोजन करण्यात आले. यातून मुक्तिपथ तालुका संघटक विनोद कोहपरे यांनी स्त्री आरोग्य शिक्षण, शाळा कार्यक्रम, पदाधिकारी भेट, गावातील ग्रामस्तरीय समिती, अध्यक्षांना जबाबदारीची जाणीव करून दिली. तसेच गावात अवैध दारूविक्री सुरु असल्याचे कळताच गावात दारूबंदी लागू करण्यासाठी महिलांना एकत्रित करून महिलांचा संघटन तयार केले. यातून संघटनेला दारूविक्रेत्यांविरोधात लढा देण्यासाठी नवीन उभारी दिली. त्यानंतर गावात दारूबंदीचा निर्णय करून महिला गावसंघटनेनी अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन शपथपत्र लिहून घेतले. परंतु दारूविक्रेते मुजोर असल्याने त्यांनी अवैध दारूविक्री सुरूच ठेवली. त्यामुळे गाव संघटनेने चार दारू विक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती करून पोलिस विभागाच्या मार्फतीने कार्यवाही केली. एवढंच नव्हे तर त्यांना ताकीद देऊन गावाशेजारील वडधा येथील ३३ केव्ही विद्युत केंद्राजवळ अवैध दारूविक्री करीत असलेल्या दारूविक्रेत्यांची दारू पकडून नष्ट केली. त्यामुळे वर्षभरापासून गावात अवैध दारूविक्री बंद आहे. आता गावात किंवा गावाशेजारी दारूविक्री बंद करण्यासाठी गाव संघटना सरसावली आहे. सोबतच डार्लीचे पोलिस पाटील टीकाराम लाकडे हे स्वतः सक्रिय असल्याने गावातील अवैध दारूविक्रीला गाव संघटनेच्या माध्यमातून आळा बसला. त्यामुळे गावात शांतता, सुव्यवस्था टिकून आहे. हा फायदा लोकांना समजल्याने गाव संघटनेला गावातून सहकार्य मिळत असून अवैध दारूविक्रीमुक्त गाव म्हणून डार्ली या गावाची ओळख निर्माण झाली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here