The गडविश्व
गडचिरोली, २६ऑगस्ट : तेंदुपत्याचे वाहतूक परवान्याकरीता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संजिव कोठारी, तालुका पेसा समन्वयक (कंत्राटी) व खासगी इसम अनिल गोवर्धन यांना रंगेहाथ पकडले. व यातील मुख्य आरोपी प्रभारी गट विकास अधिकारी प्रतिक दिवाकर चन्नावार हे फरार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी गोविंदगाव येथील तेंदुपत्ता युनिट लिलावात घेवून, सदर तेंदुपत्याचे वाहतूक परवान्याकरीता त्यांना गट विकास अधिकारी, पंचायत समिती अहेरी यांचे नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. ते मिळवून देण्याचे कामासाठी प्रतिक चन्नावार, प्रभारी गट विकास अधिकारी व संजिव कोठारी, तालुका पेसा समन्वयक (कंत्राटी) यांनी १ लाख ३० हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथे तकार दाखल केली.
पोलीस उपअधिक्षक अनिल लोखंडे यांचे पर्यवेक्षणात पो. निरीक्षक श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदार यांनी सन २०२२ यावर्षी गोविंदगाव येथील तेंदुपत्ता युनिट लिलावात घेवून सदर तेंदुपत्ताचे वाहतुक परवान्याकरीता त्यांना नाहरकत प्रमाणपत्र मिळवून देण्याचे कामाकरीता प्रतिक चन्नावार, प्रभारी गट विकास अधिकारी व संजिव कोठारी, तालुका पेसा समन्वयक, दोन्ही पं.स. अहेरी यांनी १ लाख ३० हजार रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारांसमक्ष सुस्पष्ट मागणी केली. कोठारी यांच्या सांगणेवरुन खासगी इसम अनिल गोवर्धन हे सदर लाच रक्कम १ लाख ३० हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ मिळून आले. यावरुन प्रभारी गट विकास अधिकारी व तालुका पेसा समन्वयक तसेच खाजगी इसमाविरूध्द पोलीस स्टेशन, अहेरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींच्या निवासस्थानांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्यात येत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक अनिल लोखंडे यांचे पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पो. नि. शिवाजी राठोड, पोहवा नथ्थु धोटे, पो.ना. राजेश पदमगिरवार, किशोर जौजारकर, पोशि संदीप उडान, संदिप घोरमोडे, चापोना प्रफुल डोर्लीकर सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केली.