– सीमावर्ती भागात नक्षल्यांद्वारे ड्रोन कॅमेराचा वापर ?
The गडविश्व
तेलंगणा, ७ जून : नक्षल्यांना ड्रोन कॅमेरा पुरविणाऱ्या तिघांना छत्तीसगढ- तेलंगणा सीमेवर पोलिसांनी अटक केल्याची बाब पुढे येत आहे. सदर कारवाई ने मात्र पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून सतर्क झाले आहेत. नागेश्वर (३१), देवसुरी मल्लिकार्जुन (४०) आणि उमाशंकर (४३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात नक्षली ड्रोन कॅमेराचा वापर करत पोलिसांद्वारे राबविण्यात येणाऱ्या नक्षलविरोधी अभियान तसेच पोलिसांच्या हालचालीवर लक्ष ठेवत असतात हे या कारवाई वरून उघडकीस आल्याचे बोलले जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ड्रोन कॅमेरासह अन्य स्फोटक वस्तू जप्त करण्यात आल्या असून यातील दोघेजण तेलंगणातील तर एक बिजापूरचा असल्याचे कळते.
सांगण्यात येत आहे की, छत्तीसगड लगतच्या तेलंगणातील भद्राडी कोत्तागुडम पोलिसांना काही नक्षली साथीदार सीमावर्ती भागात नक्षल्यांना स्फोटक पोहचविणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. दरम्यान पोलिसांनी येणार जाणाऱ्या वाहनाची तपासणी सुरू केली तेव्हा चारला मंडळ देवनगरजवळ पोलिसांनी एक वाहन अडवून झडती घेतली असता तिघांकडून जिलेटिनच्या काठ्या, डिटोनेटर्स, ड्रोन कॅमेरा आणि इतर स्फोटक वस्तू जप्त करण्यात आल्या. अधिक चौकशीत त्याने ही वस्तू नक्षल्यानी मागवल्याचे सांगितले. त्याच्याकडून चौकशीत अनेक खुलासे झाले आहेत. तिघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
वास्तविक नक्षल्यांकडे आतापर्यंत स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, विदेशी बंदुका, टॅबलेट आणि इतर प्रकारचे हायटेक तंत्रज्ञान असायचे. पण आता ड्रोन कॅमेराचाही वापर करत असल्याचे या करवाईतून उघडकीस आले आहे. छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्रातील सर्व चकमकींमध्ये आतापर्यंत कधीही ड्रोन कॅमेरे सापडलेले नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षल्यांनी अलीकडेच ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे. खरोखरच नक्षल्यांकडे ड्रोन कॅमेरे असतील तर पोलीस दलाला हानी पोहोचन्याची शक्यता असून चिंतेचा विषय आहे.