– योजनेत महाराष्ट्रातील सर्वात चांगले काम गडचिरोली जिल्ह्यात
The गडविश्व
गडचिरोली दि. १७ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार बहिणींना मिळाला असून त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ वितरण सोहळा आज नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जिल्हा शल्य चिकित्सक माधुरी किन्नाके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, कार्यक्रम अधिकारी अर्चना इंगोले, बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती कडू, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिश सोळंके, श्री अमित साळवे, सामाजिक कार्यकर्त्या योगिता पिपरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ संपूर्ण राज्यात मिळत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ प्रथमच देण्यात येत असून प्रत्येक पात्र महिलेला या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी सांगितले. शासनाने या योजनेसाठी पुढील मार्च महिन्यापर्यंत अर्थसंकल्पीलय तरतुद केली असल्याने निवडणूकीनंतर कोणतेही सरकार आले तरीही पूर्ण आर्थिक वर्षात या योजनेचा लाभ मिळेल. ज्या महिलांनी उशीरा अर्ज केले त्यांनाही योजनेचा लाभ जुलै महिन्यापासूनच मिळणार आहे, तरी जिल्ह्यातील सर्व महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. होळी यांनी केले. या योजनेत महाराष्ट्रातील सर्वात चांगले काम गडचिरोली जिल्ह्यात झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाचे कौतुक केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासनाद्वारे महिलांच्या सन्मानार्थ विविध कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यात महिलांना आर्थिंक स्वावलंबन देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, रोजगार देणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’, शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’, वर्षातून तीन सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’, मुलींना मोफत उच्च तंत्र शिक्षण देण्याचा शासन निर्णय, ज्येष्ठ नागरिकांसाठीची ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ आणि ‘वयोश्री योजना’, कामगार कल्याण योजना यासह राज्य व केंद्र शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेण्याचे आणि यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक व तलाठी यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे डॉ. होळी यांनी सांगितले. श्रीमती योगीता पिपरे, राजेंद्र भुयार यांनीही यावेही मनोगत व्यक्त केले. अर्चना इंगोले यांनी प्रास्ताविक केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 31 जुलै पर्यंत एक लाख 56 हजार 379 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 लाख 53 हजार 348 महिलांचे अर्ज मंजूर करून निधी मिळण्याकरिता शासनाकडे पाठविण्यात आले होते. यापैकी 1 लाख ३३ हजार महिलांच्या खात्यात माहे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे प्रत्येक 1500 प्रमाणे एकूण 3 हजार रूपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. उर्वरित 20 हजार महिला त्यांचे बँक खाते जसे जसे आधार जोडणी पूर्ण करतील तसे तसे त्यांच्या खात्यात रकम जमा होत जाईल. तसेच १ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान 42 हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 10 हजार अर्ज मंजूर करून शासनाकडे पाठविण्यात आले आहे. अर्ज स्विकारण्याची आणि तपासणी करून मंजूर करण्याची कार्यवाही निरंतर सुरूच आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत लाभ वितरणाचा राज्याचा मुख्य सोहळा पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण नियोजन भवन येथे करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रतिकात्मक स्वरूपात धनादेशचे वाटप करण्यात आले.
उपस्थितांचे आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #majhi ladki bahin yojna )