The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. २७ : तालुक्यातील रांगी गावात सायंकाळी 26 एप्रिल 2025 रोजी आलेल्या वादळामुळे सुरेश टेकाम यांच्या घरावर भलेमोठे वाळलेले चिंचेचे झाड कोसळले. हे झाड रात्री 9 वाजता अचानक घरावर पडल्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नाही, परंतु घरातील वस्तूंचे आणि इतर सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.
सुरेश टेकाम हे रांगी येथील ताडाम टोल्यावर राहतात. घराच्या छप्पराचे मोठे नुकसान झाले असून, घरातील टी.व्ही., फर्निचर आणि इतर महत्त्वाच्या वस्तू पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. झाड पडल्याने घरात प्रवेश करत असलेल्या पायऱ्या आणि भिंतींनाही गंभीर नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे सुरेश टेकाम कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत.
सुरेश टेकाम यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यांच्याशी संपर्क साधताच, त्यांनी सांगितले की, “आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने त्वरित मदत द्यावी.”
तसेच, ग्रामीण भागातील घरांच्या सुरक्षा उपायांवर प्रशासनाने गंभीर विचार करून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.
