-मुक्तिपथ गाव संघटनेचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २६ : मुलचेरा तालुक्यातील येल्ला गावात चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री करणाऱ्या दोघांना दारूसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची कृती सरपंच, पोलिस पाटील, मुक्तिपथ टीम व गाव संघटनेच्या महिलांनी केली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी ८ हजार ५०० रुपयांची देशी दारू जप्त करून एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
येल्ला गावातील अवैध दारूविक्री बंदीसाठी ग्रामस्थांनी बैठक घेऊन आपल्या गावात अवैध दारूविक्री नको, यासाठी दारूबंदीचा ठराव पारित केला. त्यानुसार गावातील अवैध दारूविक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध व्यवसाय तत्काळ बंद करा अन्यथा कारवाईला पुढे जा असा इशारा देण्यात आला. या ठरावाची अंमलबजावणी करीत गाव संघटनेच्या महिला व ग्रामस्थांनी विविध उपाययोजना करून आपल्या गावातील अवैध दारूविक्री बंद केली. मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नामुळे गावातील अवैध दारूविक्री मागील दोन महिने बंद होती. गावात दारूबंदी असल्याने गावात शांतता व सुव्यवस्था निर्माण झाली होती. अशातच एका विक्रेत्याने विक्रीकरिता गावात दारू आणली असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गावातील सरपंच, पोलिस पाटील, मुक्तिपथ टीम व गाव संघटनेच्या महिलांनी एका महिलेच्या घराची पाहणी केली असता जवळपास ८ हजार ५०० रुपये किमतीची ८५ टिल्लू देशी दारू मिळून आली. या घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जप्ती पंचनामा केला. सोबतच एका महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )