The गडविश्व
मुंबई, दि.१९ : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या विविध मराठी बोलीतील विविध गोष्टी आपल्या विनोदी ढंगाने सादर करणाऱ्या उत्कृष्ट कलाकारांची फौज ‘कॅफे कॉमेडी’ या ‘अल्ट्रा झकास’च्या स्टँड अप शोमध्ये दाखल झाली आहे. ‘कॅफे कॉमेडी’ हा ओटीटी माध्यमावर येणारा पहिला स्टँड अप शो महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचून रसिक प्रेक्षकांचं मन दिवसेंदिवस जिंकून घेत आहे.
‘कॅफे कॉमेडी’ स्टँड अप शो आशिष पाथरे यांनी निर्मित केले असून अमोल जाधव हे दिग्दर्शन करत आहेत. शोमध्ये संदीप गायकवाड, मंदार मांडवकर, आकांक्षा अशोक, किमया मयेकर, रोहन कोतेकर, केतन साळवी, सचिन सकपाळ आणि रामदास टेकाळे हे कलाकार आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करत आहेत. या कलाकारांसोबतच आणखी तगडे कलाकार शोमध्ये आपले कौशल्य दाखवण्यासाठी येणार आहेत. तसेच मराठमोळी अभिनेत्री काजल केशव आपल्या खास सूत्रसंचालनाने या शोची खास आकर्षण बनली आहे.
“कॅफे कॉमेडी’ हा शो प्रेक्षकांचं खास मनोरंजन करतो आहेच पण त्याचबरोबर शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात दडलेल्या नव्या कलाकारांना मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.